पुणे : पुणे जिल्हा हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असताना त्यांच्या अकाली निधनाने निवडणुकीवर दु:खाचे सावट आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या ७३ गटांपैकी ५९ गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप हे महायुतीतील दोन मित्रपक्ष समोरासमोर आहेत. अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’बाबत सहानुभूतीची लाट असताना तीन दिवसांच्या दुखवट्याचा कालावधी संपताच भाजपने स्थानिक पातळीवर प्रचारासाठी गाठीभेटींवर जोर दिला. आता नेतृत्त्वाअभावी अजित पवारांचा हा बालेकिल्ला भाजप काबीज करणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र निवडणूक लढवित आहेत. ७३ गटांपैकी अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे ७१ उमेदवार आहेत. शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे सात ठिकाणी उमेदवार आहेत. आंबेगाव, मावळ आणि मुळशी तालुक्यांमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर आहेत. भाजपचे ५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षही स्वबळावर निवडणूक लढवित आहे. त्यांनी ३६ ठिकाणी उमेदवार केले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) हे दोन्ही पक्ष स्वबळावर नशीब आजमावणार आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे २६ उमेदवार आहेत. याशिवाय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आणि बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) या पक्षांनीही उमेदवार उभे केले आहेत. मात्र, खरी लढत ही अजित पवारांची ‘राष्ट्रवादी’ आणि भाजप यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. गुरुवारी (पाच फेब्रुवारी) रात्री दहा वाजता प्रचाराची सांगता आणि सात फेब्रुवारीला मतदान होत आहे. नऊ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.
गेल्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ जागा जिंकून जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली. तत्कालीन शिवसेनेला १३, भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी सात जागांवर समाधान मानावे लागले होते. आता भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली आहे. दौंडमध्ये राहुल कुल, खडकवासल्यात भीमराव तापकीर, भोसरीत महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप हे भाजपचे आमदार आहेत. तसेच भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपचे बळ वाढले आहे. त्यामुळे दोन्ही ‘राष्ट्रवादी’समोर भाजपचे आव्हान असणार आहे. हवेली, दौंड, शिरूर आणि इंदापूर या तालुक्यांत भाजप आणि दोन्ही ‘राष्ट्रवादी’ यांच्यात सरळ लढत आहे.
दोन्ही ‘राष्ट्रवादी’ दु:खात असताना भाजपने दुखवटा संपताच प्रचाराला सुरुवात केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या आणि आणि मेळाव्यांवर भर देण्याच्या सूचना केल्या. प्रचारासाठी प्रदेश स्तरावरील मंत्री किंवा पदाधिकारी येणार नसल्याने त्यांनी स्पष्ट केल्याने स्थानिक पातळीवर प्रचार करताना मतदारांच्या गाठीभेटींवर भर देण्यात आला. याउलट अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही ‘राष्ट्रवादी’कडे नेतृत्त्वाचा अभाव दिसून आला. ‘राष्ट्रवादी’बाबत सहानुभूतीची लाट असताना भाजप ही जिल्हा परिषद काबीज करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

