पुणे : विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त होणार असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, आमदारकीची माळ गळ्यात पडण्यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींना ‘गळ’ टाकण्यास सुरुवात केली आहे. आगामी तीन वर्षांत कोणतीही निवडणूक नसल्याने ‘आता नाही तर कधीच नाही’ असे समजून पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.

विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार असून, त्यासाठी २३ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. संख्याबळानुसार नऊ जागांपैकी पाच जागा भाजप, दोन जागा शिवसेना (शिंदे) एक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि एक जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुण्यात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.

भाजपमध्ये उदंड जाहले इच्छुक

भाजपच्या पाच जागांसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. त्यामध्ये पुण्यातून प्रामुख्याने दोन नावांची चर्चा आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक हे आहेत. पांडे यांनी पुस्तक महोत्सव यशस्वी करून दाखवला आहे. त्यातून त्यांचे नियोजन कौशल्य पक्षाला दिसून आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि भाजपचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू साथीदार समजले जातात. विधानसभेच्या निवडणुकीत वडगाव शेरीमधून ते उमेदवारीचे दावेदार होते. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आग्रहामुळे माजी आमदार सुनील टिंगरे यांना उमेेदवारी देण्यात आली. त्यामुळे मुळीक हे नाराज झाले. आता विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे.

भाजपने पुणे शहराबरोबरच जिल्ह्यात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुकांपैकीही कोणाला तरी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोघांचेही मतदार संघ हे बारामती लोकसभा मतदार संंघात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान उभे करण्यासाठी या दोघांपैकी एकाला आमदारकी देऊन भाजप ‘मिशन बारामती’साठी नियोजन करण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून दोन नावे आघाडीवर

शिवसेना (शिंदे) पक्षाकडे दोन जागा असून. त्यासाठी पुण्यातून दोन नावे आघाडीवर आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पुण्यात भाजपला जेरीस आणणारे कसबा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पुन्हा आमदारकी देऊन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपपुढे आव्हान उभे करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धंंगेकर हे पुणे शहर महानगरप्रमुख आहेत. सध्या शिवसेनेची शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी तयार करताना धंगेकर यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. रोहित टिळक यांचे नाव राज्यसभेच्या वेळी चर्चेत होते. मात्र, त्यानंतर या चर्चेला विराम मिळाला.

‘राष्ट्रवादी’त पुणे, पिंपरीतील इच्छुक

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे एकच जागा आहे. या जागेसाठी पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील इच्छुक आहेत. ‘राष्ट्रवादी’चे पुण्यात माजी आमदार सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप हे दोन शहराध्यक्ष आहेत. हे दोघेही इच्छुक आहेत. पिंपरी-चिंचवडमधून नगरसेवक नाना काटे, योगेश बहल यांची नावे आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे कोणाला संधी देणार, याबाबत उसुकता असणार आहे.

शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंच्या निर्णय महत्त्वाचा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेवरील कार्यकाळ संपणार आहे. ठाकरे यांनी पुन्हा परिषदेवर जाण्याचा निर्णय न घेतल्यास या जागेसाठी पुण्यातून प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.