पुणे : पुणे महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता असली तरी काही मोजकेच पदाधिकारी संपूर्ण कारभार चालवत असल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेतील पदाधिकारी विरुद्ध नगरसेवक यांच्यामध्ये धुसफूस सुरू आहे. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तक्रार थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत करण्यात आली होती. मात्र त्यानंतर फारसा बदल झालेला नाही.
महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना पुरेसा निधी मिळत नसल्याची ओरड आहे. राज्यातील नेत्यांनी महापालिकेच्या कारभाराची जबाबदारी ज्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. ते पदाधिकारी मनमानी करत असून केवळ मर्जीतील नगरसेवकांनाच निधी दिला जातो. पक्षाच्या इतर सदस्यांना मात्र निधीसाठी वारंवार पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात.
शहरात भाजपचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचेही पालिकेतील पदाधिकारी ऐकत नसल्याची तक्रार काही महिन्यांपूर्वी नगरसेवकांनी राज्यातील नेत्यांकडे केली होती. पक्षाचे शहरातील खासदार, आमदार, मंत्री यांच्याबरोबर पदाधिकाऱ्यांनी काम केले असल्याने ही मंडळी देखील अधिकारवाणीने पदाधिकाऱ्यांना सुनावत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. भाजपमध्ये तीन ते चार गट निर्माण झाले असून प्रत्येक पदाधिकारी आपल्या गटातील सभासदांचे हित कसे होईल याकडे लक्ष देत असल्याचे चित्र आहे.
गेल्या आठवड्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमासाठी मोजक्याच नगरसेवकांनी हजेरी लावली होती. महापालिकेत भाजपचे सव्वाशे पेक्षा अधिक नगरसेवक असताना केवळ २० ते २२ नगरसेवकच या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शंभरपेक्षा अधिक नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने सभागृह नेते गणेश बीडकर यांनी गंभीर दखल घेत उपस्थित नगरसेवकांनी नावे लिहून घेतली.
भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्याची ख्याती आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा आदेशाचे पालन करणे पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बंधनकारक असते. त्यामुळे पक्षाचे आंदोलन असो, मोर्चा असो, बैठक असो, किंवा एखादा कार्यक्रम असो, नगरसेवक, पदाधिकारी यांची उपस्थिती मोठी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आपलेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही सभागृहात विषयावर मतदान घेण्याची वेळ आल्यास आवश्यक सदस्य गोळा करताना तारांबळ उडाल्याचे प्रकार घडले आहेत.
सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक म्हणून काम करताना भाजपच्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यासाठी कमी वेळेत कामे मार्गी लागणे गरजेचे आहे. मात्र महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याची मर्जी सांभाळली की दुसरा पदाधिकारी नाराज होतो. त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांची मर्जी सांभाळतानाच नगरसेवकांच्या नाकी नऊ आले आहे. पदाधिकाऱ्यांची अंतर्गत धुसफूस पक्षासाठी कशी घातक आहे, याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वारंवार सावध केले. मात्र त्यानंतरही त्यामध्ये फारसा बदल न झाल्याने भाजपच्या नगरसेवकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमासाठी नगरसेवकांनी फिरविलेली पाठ हा त्याचाच एक भाग असल्याची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमास बोटावर मोजता येईल एवढ्याच नगरसेवकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा दीड ते दोन तास उशिरा सुरू झाल्याने नगरसेवक निघून गेल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाकडे नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे लक्षात येताच सभागृह नेते बीडकर यांनी व्यासपीठावरून खाली येऊन उपस्थित नगरसेवकांची नावे लिहून घेतली. कार्यक्रमासाठी अनुपस्थित नगरसेवकांवर आता पक्ष काय कारवाई करणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
