पुणे : पुणे महापालिकेमध्ये भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांपैकी पाच जणांची निवड झाली असून, दोन उमेदवारांचे अर्ज कागदपत्रे अपूर्ण असल्याने रद्द करण्यात आले आहेत.
त्यामुळे या दोन जागांवर भाजपामधील अन्य इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्या दोन उमेदवारांना पुन्हा संधी द्यायची की नाही, यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. त्याच उमेदवारांची नेमणूक करण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांची असताना, अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना त्याच निवडणुकीत उभे राहता येत नसल्याचा दावा करत दुसऱ्या गटाकडून अन्य दोघांची नियुक्ती करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. त्यावरून भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
पुणे महापालिकेत भाजपचे ११९, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे २७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तीन, काँग्रेसचे १५, शिवसेना (ठाकरे) पक्षाचा एक नगरसेवक आहे. महापालिकेत १६५ नगरसेवक असून, दहा स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. पक्षीय संख्याबळानुसार भाजपला सात, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला दोन आणि काँग्रेसला एकाची निवड करायची होती. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि राकेश कामठे यांची, तर काँग्रेसने कामगार नेते सुनिल शिंदे यांची निवड केली आहे.
भाजपाने रवि साळवेकर, विश्वास ननावरे, उदय लेले, राजेंद्र काकडे, नीलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे आणि जयप्रकाश पुरोहित या सातजणांची नावे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे दिली. मात्र, प्रियंका शेडगे आणि जयप्रकाश पुरोहित यांच्या अर्जाबरोबर कागदपत्रे अपुरी होती. त्यामुळे त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले नाहीत.
त्या जागांसाठी आता महापालिका आयुक्तांना नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. भाजपच्या पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, तर काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्याच्या निवडीला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. आता रिक्त राहिलेल्या दोन जागांवरून भाजपने वाद सुरू झाला आहे.
भाजपने सात उमेदवार निवडताना शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ‘शब्द’ दिलेल्या उमेदवारांची वर्णी लागेल, याची खबरदारी घेतली. त्यानुसार कोथरुड विधानसभा मतदारसंघातून नीलेश कोंढाळकर, पर्वती विधानसभा मतदारसंघातून प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे, कसबा विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र काकडे, उदय लेले, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून रवींद्र साळेगावकर, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून जयप्रकाश पुरोहित ही नावे निश्चित झाली होती. खडकवासला विधानसभा मतदार संघामधून भाजपने कोणालाही संधी दिली नव्हती. मात्र, शेंडगे आणि पुरोहित यांचे अर्ज अपूर्ण असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली नाही.
महापालिका आयुक्त नव्याने प्रक्रिया राबविणार आहेत. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इच्छुकांकडून नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे.
शेंडगे आणि पुरोहित यांचे अर्ज पुन्हा दाखल करण्यावरून भाजपने दोन गट पडले आहेत. अर्ज बाद झालेल्या उमेदवाराला त्याच निवडणुकीत उभे राहता येत नसल्याने दोघांना पुन्हा संंधी देण्यात येऊ नये, असे एका गटाचे म्हणणे आहे. मात्र, दुसऱ्या गटाकडून त्यांचीच निवड करण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. त्यावरून भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचे सांगण्यात आले.
मनसेच्या भूमिकेमुळे भाजपाची कोंडी
अर्ज बाद करण्यात आलेल्या दोन उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला आहे. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन आक्षेप नोंदविला आहे.
स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत पक्षपातीपणा आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसेच खुलासा न दिल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे भाजपची कोंडी झाली आहे.
