पुणे : राज्यात महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) हे तीन मित्र पक्ष सत्तेत एकत्र आहेत. मात्र, पुणे महापालिकेत सुरू असलेल्या राजकारणाकडे पाहिले, तर या महायुतीचे वास्तव काहीसे वेगळे दिसते. राज्याच्या सत्तेत मैत्रीची भाषा; पण स्थानिक पातळीवर सन्मान नाही, असे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील नेत्यांत, आपल्याला दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना तीव्र होत आहे.

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. पण, पुणे महापालिकेत मात्र तिन्ही पक्ष एकत्र नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे तर विरोधी पक्षनेतेपद आहे. आता राज्यातील मैत्री पुणे महापालिकेत निभवायची अपेक्षा भाजप राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठेवतो खरे, पण याच पक्षाच्या सदस्यांना सर्वसाधारण सभेत मात्र सत्ताधाऱ्यांकडून बोलण्यापासून वंचित ठेवले जाते.

गेल्या आठवड्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात आला होता. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेले स्वागत फलक हा महायुतीतील या कुरबुरीचा ताजा नमुना. या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर मंजूषा नागपुरे यांची छायाचित्रे झळकली. मात्र, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छायाचित्रे काही दिसली नाहीत. हा केवळ तांत्रिक घोळ होता, की जाणीवपूर्वक घेतलेली राजकीय भूमिका, हा प्रश्न यामुळे स्वाभाविकपणे उपस्थित झाला.

‘राजशिष्टाचार पाळणे ही केवळ औपचारिकता नसते, तर ती सत्तेत असलेल्या घटक पक्षांबद्दलचा परस्पर आदर व्यक्त करणारी बाब आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे उपमुख्यमंत्रिपद सुनेत्रा पवार यांच्याकडे आले. पुण्याचे पालकमंत्रिपददेखील सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे पवार यांना अधिकृत कार्यक्रमांमध्ये स्थान मिळणे अपेक्षित आहे. अशा वेळी त्यांचे नाव, छायाचित्र, कार्यक्रम पत्रिकेतून, जाहिरात फलकांवरून वगळले जाणे, हे केवळ विसरायला झाले, म्हणून सहज कसे स्वीकारता येईल,’ असा सवाल ‘राष्ट्रवादी’कडून उपस्थित केला गेला आहे.

पालख्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे छायाचित्र, तसेच नाव नसणे हा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने दिलेला संदेश नेमका कोणासाठी होता, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला डावलण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. पुणे महापालिकेतील अनेक निर्णय प्रक्रियांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला वारंवार दुय्यम स्थान दिल्याची भावना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही व्यक्त केली आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा एका दिवसात आटोपण्याऐवजी दोन-तीन दिवस चालवावी, जेणेकरून विरोधी आणि मित्रपक्षातील सदस्यांनाही पुरेशी संधी मिळेल, अशी मागणी राष्ट्रवादीने (अजित पवार) केली होती. मात्र, ती सातत्याने दुर्लक्षित केली गेल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर या संदर्भात ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रारीही केल्या आहेत.

महापालिकेत प्रस्ताव मंजूर करताना किंवा राजकीय गणिते जुळवताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची साथ आवश्यक वाटते; पण श्रेय घेण्याची वेळ आली किंवा सार्वजनिक व्यासपीठावर सन्मान देण्याचा प्रश्न निर्माण झाला, की मित्रपक्षाला मागे ठेवले जाते, असा संदेश यामुळे गेल्याचे ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी बोलून दाखवतात.