पुणे : पुणे आणि पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन आठवड्यांंपासून पुण्यात तळ ठोकला असून, उमेदवारांची जुळवाजुळव केल्यानंतर भाजपला लक्ष्य करत त्यांनी प्रचारात रंगत आणली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हेदेखील प्रचारासाठी रणांगणात उतरल्याने दोन्ही ‘राष्ट्रवादी’मध्ये उत्सवाचे वातावरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र येऊन निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दोन आठवड्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. अन्य महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी गेल्यावर ते माघारी पुण्यातील निवासस्थानी येत आहेत. या दोन्ही महापालिकांच्या निवडणुका त्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.
उमेदवार निश्चित करताना त्यांनी भाजपने डावललेल्या काही प्रमुख स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना भाजपच्या विरोधात उभे केले आहे. त्यामुळे आतापर्यंत भाजपच्यादृष्टीने एकतर्फी दिसणारी निवडणूक आता चुरसीची झाली आहे. अजित पवार यांनी पुण्यात ऐनवेळी उमेदवारांची जुळवाजुळव केल्यानंतर काही प्रभागांमध्ये भाजपसमोर ‘राष्ट्रवादी’चे आव्हान उभे राहिले आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीची मुदत संपल्यानंतर अजित पवार हे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा, ‘रोड शो’ यांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधतानाच भाजपवर टीका करत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांवर भाजपची सत्ता होती. त्यामुळे कारभारी बदला, असे आवाहन अजित पवार करत आहेत.
अजित पवार हे प्रचाराची राळ उडवत असताना आमदार रोहित पवार हेदेखील प्रचारासाठी रणांगणात उतरले आहेत. पिंपरी आणि पुण्यात रोहित पवार यांनी प्रचार सभा आणि मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
मुरलीधर मोहोळ ‘लक्ष्य’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केल्यानंतर मोहोळ हेदेखील अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. आता रोहित पवार यांनीही मोहोळ यांच्यावर टीका सुरू केली आहे. गुंड नीलेश घायवळ याला पारपत्र देण्याच्या विषयावरून चर्चेस तयार असल्याचे आव्हान रोहित पवार यांनी मोहोळ याना दिले आहे. घायवळ हा पुण्यातून तडीपार करण्यात आल्यानंतर रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघात राहायला होता. रोहित पवार यांच्या आव्हानामुळे पवार यांनी मोहोळ यांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुप्रिया सुळे आज पुण्यात
अजित पवार आणि रोहित पवार हे दोघे प्रचारात सक्रिय झाले असताना खासदार सुप्रिया सुळे या आतापर्यंत पुण्यात प्रचारासाठी आल्या नव्हत्या. शनिवारी पक्षाच्या जाहीरनाम्याच्या निमित्ताने आजित पवार आणि सुळे हे पुण्यात एकत्र येणार आहेत. त्यामुळे दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘पक्षाचा जाहीरनामा शनिवारी प्रसिद्ध केला जाणार आहे. त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित राहणार आहेत’ असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी सांगितले.
