पुणे : लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायती आणि पंचायत समिती या सर्व स्तरांवर लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर पुणे जिल्ह्यातील काँग्रेसला जाग आली आहे. पक्ष बांधणीसाठी पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्यासाठी ‘काँग्रेस आपल्या दारी’ ही मोहीम या पक्षाने हाती घेतली आहे. त्यामुळे उशीरा का होईना, पक्षाच्या अस्तित्त्वासाठी काँग्रेस कामाला लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसला लोकसभेपासून पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेला अपयश आल्यावर विधानसभा निवडणुकीत भोपळा फोडणे अशक्य झाले. त्यानंतर नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसवर नामुष्की ओढवली. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ७३ गटांपैकी एकाही ठिकाणी विजय मिळविता आला नाही. नगर पंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही अपयशाची मालिका कायम राहिली. महापालिकेच्या निवडणुकीत पुणे महापालिकेत १६५ पैकी १५ जागांवर यश मिळवून इभ्रत राखण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, निवडून आलेले १५ नगरसेवक हे काँग्रेस पक्षाच्या ताकदीपेक्षा प्रभागातील वैयक्तिक करिष्म्यावर विजयी झाल्याचे दिसून येते. मात्र, या विजयामुळे काँग्रेसला पुण्यात उर्जितावस्था आली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आता बहुतांश निवडणुका पार पडल्या असून, काही सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याचा निणय घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात ‘काँग्रेस आपल्या दारी’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा एकदा पूर्वीचे दिवस आणण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार दौऱ्याची सुरुवात दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यापासून करण्यात आली आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे जिल्ह्याचा दौरा करणार असून, या दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
‘आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. ‘काँग्रेस आपल्या दारी’ या संकल्पनेतून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करण्यात आला आहे. संघटना मजबूत करण्याबराेबरच कार्यकर्त्यांना ताकद देणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.’ असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
शहर काँग्रेस ‘स्वान्तसुखाय’
जिल्ह्यातील काँग्रेसने पक्ष संघटनेसाठी हालचाली करण्यास सुरुवात केली असली, तरी पुणे शहरातील काँग्रेस ही ‘स्वान्तसुखाय’ अवस्थेत आहे. मागील पुणे महापालिकेच्या निवडणुकीत जेमतेम नऊ जागा मिळल्या होत्या. यंदा तेवढ्याही जागा मिळण्याची अपेक्षा नसताना १५ जागांची लॉटरी लागल्यासारखे झाले आहे. त्यामुळे शहर काँग्रेस ही पूर्वीप्रमाणे शांततेच्या भूमिकेत आहे. काँग्रेस भवन समोर भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या वादावादीनंतर थोडाफार विरोध करण्याचा प्रयत्न शहर काँग्रेसने केला. मात्र, आता परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
