पुणे : पुण्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष पेटला असून, दगडफेक आणि मारहाणीपर्यंत मजल गेली आहे. काँग्रेस भवनसमोर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्याची गर्जना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाणीचा प्रकार झाल्यानंतरही काँग्रेसने आक्रमक न होता मोर्चा न काढण्याचा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी मोर्चा काढल्यास भविष्यात काय होईल, याचा ‘अंदाज’ नेत्यांना आल्याने काँग्रेसलाच धडक मोर्चाची ‘धडकी’ भरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ भाजपने गेल्या आठवड्यात काँग्रेस भवन येथे केलेल्या आंदोलनात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिल्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. पोलिसांनी आंदोलन काँग्रेस भवनपासून १०० मीटर दूर करण्यास परवानगी द्यायला हवी होती, अशी टीका करण्यात आली. पोलिसांच्या या कामकाजाचा निषेध म्हणून पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्याची गर्जना नेत्यांनी केली. मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नेत्यांनी कार्यकर्त्यांनह केले. या आवाहनाला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. १५ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्याने माेर्चाला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे समजते.

काँग्रेस भवनसमोर झालेल्या प्रकारानंतर सोमवारी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाणीचा प्रकार घडला. पवार यांना मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी तुषार दामगुडे यांच्यासह साथीदारांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाणीचे दोन आठवड्यात दोन प्रकार घडल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून धडक मोर्चा काढण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, माेर्चा काढल्यास भविष्यात काय होईल, याचा अंदाज आल्याने काँग्रेसच्या नेत्यांना धडक मोर्चाची ‘धडकी’ भरली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रभागासाठी शून्य निधीची भीती

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचे ११९ नगरसेवकांसह बहुमत आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड झाल्यामुळे आता भाजपकडून महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. मोर्चा काढल्यास आपल्या प्रभागाला शून्य निधी दिला जाण्याची भीती काही नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये आहे. प्रभागाला निधी न मिळाल्यास विकासकामे करता येणार नाहीत. त्यामुळे मतदारांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडणार आहे. यापूर्वी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला प्रभागासाठी शून्य निधी देण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे धडक मोर्चाची धडकी काँग्रेसच्या नेत्यांना भरली असल्याचे सांगण्यात येते.

नेतृत्त्व केल्यास सत्ताधारी, पोलिसांकडून ‘लक्ष्य’?

पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढल्यास भविष्यात पोलीस आणि सत्ताधाऱ्यांकडून ‘लक्ष्य’ केले जाण्याचीही भीती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे धडक मोर्चाबाबत आता कोणीही बोलण्यास तयार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.