पुणे : काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुणे शहराच्या राजकारणाला दिशा देणारे आणि पुण्यावर काँग्रेसची सत्ता कायम ठेवणारे ‘सबसे बडा खिलाडी’ काँग्रेसचे दिवंगत खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांचा काँग्रेसलाच विसर पडला. कलमाडी यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर पुणे महापालिकेतील काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार काही वेळेसाठी स्थगित करण्याची सूचना काँग्रेसच्या नेत्यांनी दिली नाही. त्यामुळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना काही नेते आणि उमेदवार हे प्रचारात गुंतले होते.
कलमाडी यांनी पुण्यातील काँग्रेस भवन येथून सलग ३५ वर्षे कारभार पाहिला, त्या काँग्रेस भवनमध्ये कलमाडी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्याची तसदीही स्थानिक नेत्यांनी घेतले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कलमाडी यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर काँग्रेसचे ठरावीक नेते हे ‘कलमाडी हाउस’ या त्यांच्या निवासस्थानी गेले. मात्र, अन्य स्थानिक नेते आणि काँग्रेसचे उमेदवार हे प्रचारात गुंतले होते. कलमाडी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तूर्त स्थगिती देण्याबाबत काँग्रेसच्या स्थनिक नेत्यांनी सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे कलमाडी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार होत असताना काही स्थानिक नेते आणि उमेदवार हे प्रचारात गुंतले होते.
काँग्रेस पक्षाबाबत दु:खद घटना घडली असल्याने प्रचार थांबविण्याबाबत काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी काही पदाधिकारी आणि उमेदवारांना सांगितल्यानंतर काही उमेदवारांनी प्रचार काही वेळ थांबविला. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून याबाबत शेवटपर्यंत सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार सुरू राहिला. काँग्रेसच्या या कृतीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील काँग्रेस भवन हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे भेटीगाठी आणि चर्चेचे ठिकाण आहे. कलमाडी हे पुण्याचे खासदार आणि महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेस भवन येथे भेट द्यायचे. काँग्रेस भवनमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चर्चा करायचे. त्यामुळे त्या काळात काँग्रेस भवन हे कायम कार्यकर्त्यांनी गजबजलेले असायचे. त्यामुळे कलमाडी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस भवन येथे आणण्याची सूचना काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र, स्थानिक नेत्यांनी या सूचनेकडे कानाडोळा केला. त्यांनी कलमाडी यांचे पार्थिव काँग्रेस भवन येथे आणण्याची तसदी घेतली नसल्याची नाराजी काही काँग्रेसच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
मोजक्याच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
कलमाडी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मनाशभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी कलमाडी यांनी संधी दिल्यामुळ राजकारणात नावलौकिक झालेल्या काँग्रेसच्या काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. काँग्रेस सोडून अन्य पक्षात गेलेलेही काही जण कलमाडी यांच्या उपकाराची जाणीव ठेवून अंत्यसंस्कारासाठी आले. त्यामुळे कोण आले आणि कोण उपस्थित नव्हते, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
