पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्ये राजकीय ‘संशयकल्लोळ’ सुरू झाला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ही जागा देण्यात आली असताना त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसवर नामुष्की ओढावली. त्यावरून पुण्याच्या प्रभारी शहराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागलेले अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. त्यांनी सपकाळ यांची या निवडणुकीतील भूमिका संशयास्पद असल्याची तक्रार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करून यांच्याकडे केल्याने काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या राजकीय खेळीत काँग्रेसला नामुष्की पप्त्करावी लागली. या निवडणुकीत जास्त मते असतानाही काँग्रेसने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला उमेदवार उभे करण्याची संधी दिली. या पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली.

हा निर्णय घेताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी संवाद न साधता वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्याने पुण्यातील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अरविंद शिंदे यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त करून राष्ट्रीय अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. शिंदे यांच्या बंडखोरीला शहराध्यक्ष पद कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय र्वतुळात सुरू झाली आहे.

शिंदे हे २०२२ पासून काँग्रेसचे पुणे शहराचे प्रभारी शहराध्यक्ष होते. काँग्रेसने ‘संघटन सृजन’ मोहीम राबविली. त्यानंतर पूर्णवेळ शहराध्यक्ष म्हणून नेमणूक होईल, अशी शिंदे यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांना डावलून सपकाळ यांनी पुणे शहरासाठी दोन शहराध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला. पूर्व विभागाच्या शहराध्यक्षपदी प्रशांत जगताप आणि पश्चिम विभागासाठी माजी आमदार दीप्ती चवधरी यांची नेमणूक केली. त्यानंतर शिंदे हे नाराज झाले. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसवर नामुष्कीची वेळ आल्याची संधी साधत शिंदे यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांना पत्र पाठवून सपकाळ यांच्या चौकशीची मागणी केल्याने काँग्रेसमधील वाद उफाळून आला आहे.

शिंदे यांचे सवाल

शिंदे यांनी खरगे यांना पाठविलेल्या पत्रामध्ये काही प्रश्न विचारले आहेत. भाजपविरुद्ध कडवा संघर्ष करण्याची संधी असताना काँग्रेसला मैदानाबाहेर ठेवण्याचे षडयंत्र कोणी रचले? कोणाच्या दबावाखाली हा निर्णय झाला? कोणत्या नेत्यांनी काँग्रेसच्या हिताशी तडजोड केली? या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेसचे नुकसान करून कोणाचा राजकीय फायदा साधला गेला?

शिंदे यांच्या मागण्या

विधान परिषद निवडणुकीतील घडामोडींची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून चौकशी अहवाल पक्षश्रेष्ठींसमोर सादर करण्यात यावा.

काँग्रेस पक्षाच्या राजकीय हिताला तिलांजली देणाऱ्या आणि कार्यकत्यांच्या विश्वासाशी गद्दारी करणाऱ्या व्यक्तींवर कठोर संघटनात्मक कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या गुप्त राजकीय सौदेबाजीला आळा घालण्यासाठी स्पष्ट पक्षीय धोरण जाहीर करण्यात यावे.

शहर काँग्रेसमधील लोकनिर्वाचित प्रतिनिधी, वरिष्ठ माजी आणि विद्यमान पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करूनच भविष्यातील महत्त्वाचे राजकीय निर्णय घेण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावेत.

पुण्यात काँग्रेस पक्षाकडे किमान संघर्ष करण्याएवढे पुरेसे संख्याबळ, प्रभावी संघटनशक्ती आणि भाजपला थेट आव्हान देण्याची क्षमता असताना काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या रिंगणातूनच दूर ठेवण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने पुणे शहरातील काँग्रेस, स्थानिक पदाधिकारी, माजी, विद्यमान लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतले असतील, तर ते संघटनाविरोधी कृत्य आहे. आघाडीच्या नावाखाली काँग्रेसचा पाठिंबा घ्यायचा, काँग्रेसला निवडणुकीपासून दूर ठेवायचे आणि शेवटच्या क्षणी संपूर्ण समीकरण बदलून भाजपला अप्रत्यक्ष लाभ मिळवून द्यायचा, असे चित्र जनमानसात, सामान्य कार्यकर्त्यात निर्माण झाले आहे. – अरविंद शिंदे, माजी शहराध्यक्ष, काँग्रेस