पुणे : एकेकाळी पुण्यावर सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसला महापालिकेच्या निवडणुकीत १५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसमध्ये असलेल्या ‘भाजपधार्जिण’ एका ज्येष्ठ नेत्यामुळे पक्षाचे नुकसान झाले असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे (एनएसयूआय) माजी प्रदेशाध्यक्ष ॲड. अमीर शेख यांनी केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. याबाबतची तक्रार शेख यांनी थेट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे केल्याने पुण्यातील काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकले नाही. १६५ पैकी अवघ्या १५ जागा काँग्रेसला मिळू शकल्या. काँग्रेसमध्ये असलेल्या ‘भाजपधार्जिण’ नेत्यामुळे पक्षाचे नुकसान झाल्याची टीका ॲड. अमीर शेख यांनी केली असून, शहरातील एका ज्येष्ठ नेत्याने महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी तिकीट वाटप करताना गैरप्रकार केल्याबाबतची तक्रार राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी राहुल गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनाही पाठविले आहे. शहरातील संबंधित ज्येष्ठ नेत्याने उमेदवार निश्चित करताना चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून ‘त्या’ नेत्याने मनसेचे माजी नगरसेवक राजू पवार आणि समाधान शिंदे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली. या दोघांनी निवडणुकीनंतरही आजतागायत काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला नसल्याचा दावा ॲड. शेख यांनी केला आहे.

प्रभाग क्रमांक २८ मध्ये एका बाहेरील व्यक्तीला काँग्रेसने तिकीट दिले. मात्र, त्या उमेदवाराने निवडणूक लढविली नाही. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचे शेख यांनी पत्रात नमूद केले आहे.

याबाबत ॲड. अमीर शेख म्हणाले,‘ महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना एका ज्येष्ठ नेत्याने केलेल्या गैरप्रकारांबाबत राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. राहुल गांधी यांची भेट घेऊन याबाबत पुराव्यांसह माहिती देणार आहे. उमेदवारी देताना चुकीचे निर्णय घेतल्याचा फटका पक्षाला बसला. काँग्रेसमध्ये असलेल्या ‘भाजप प्रवृत्ती’च्या नेत्यामुळे पक्षावर नामुष्की आली’

‘स्वीकृत’वरूनही वाद

काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या एका जागेच्या नियुक्तीवरूनही वाद झाल्याने या वादाची दखल राज्य पातळीवरील नेत्यांना घ्यावी लागली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन, आणि विरेंद्र जगताप या तीन नेत्यांना पुण्यात दोन्ही गटांमध्ये समेट घडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर कामगार नेते सुनील शिंदे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. या निवडीवरूनही वाद उफाळून आला. या पदासाठी ६७ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, राजकीय क्षेत्रातील कोणाचीही निवड न झाल्याने नाराजी उफाळून आली आहे. आता महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार निवडताना गैरप्रकार झाल्याची तक्रार नऊ वर्षे ‘एनएययूआय’चे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले आणि विद्यमान प्रदेश सरचिटणीस शेख यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.