पुणे : पुणे महापालिकेमध्ये काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक मिळणार असून, हे पद मिळविण्यासाठी शहर काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. याची दखल राज्य पातळीवरील नेत्यांनी घेतली असून, त्यावर तोडगा करण्यासाठी स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतींसाठी आणि स्थानिक नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी राज्य पातळीवरील तीन नेत्यांना पुण्यात पाठवण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला १५ जागा मिळाल्या असल्याने एक स्वीकृत नगरसेवकपद मिळणार आहे. या एका पदासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यावरून शहर काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. निवडणूक लढविलेल्या माजी नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात येऊ नये, अशी भूमिका एका गटाने घेतली आहे, तर दुसरा गट अनुभवी नगरसेवकाला संधी देण्याचा आग्रह धरत आहे. त्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादाची दखल आता राज्य पातळीवरील नेत्यांनी घेतली आहे. या वादातून तोडगा काढण्यासाठी राज्य पातळीवरील तीन नेत्यांना पुण्यात पाठवण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन, आणि वीरेंद्र जगताप या तीन नेत्यांना पुण्यात दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी येत्या सोमवारी (९ मार्च) महापालिका आयुक्तांकडे नावे द्यायची आहेत. या पार्श्वभूमीवर चौधरी, हुसेन आणि जगताप हे तिघेजण इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत; तसेच याबाबत शहरातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

एका जागेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची वेळ

स्वीकृत नगरसेवकपदाच्या उमेदवारांची नावे काँग्रेसकडून आतापर्यंत स्थानिक नेते निश्चित करत. नावे निश्चित झाल्यानंतर संबंधित यादी प्रदेश पातळीवर पाठवण्यात येत असे. त्यानंतर राज्य पातळीवरील नेत्यांकडून नावे अंतिम करून ती यादी शहर काँग्रेसकडे पाठवली जाते. मात्र, या वेळी एकच जागा असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे; तसेच स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजी वाढली असल्याने एका नावावर अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. परिणामी, राज्यातील नेत्यांना पुण्यात यावे लागले आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी मुलाखती काँग्रेसकडून घेतल्या जात नव्हत्या. मात्र, या वेळी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा फार्स काँग्रेसला करावा लागणार आहे.

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल  दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजपला ११९, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे २७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवा पक्षाला तीन, काँग्रेसला १५, शिवसेना (ठाकरे) पक्षाला एक जागा मिळाली. शिवसेना (शिंदे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) एकाही ठिकाणी विजय मिळविता आला नाही. महापालिकेत १६५ नगरसेवक असून, दहा स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. त्यामध्ये भाजपचे सात, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळणार आहे.