पुणे : पुणे महापालिकेमध्ये काँग्रेसच्या एका स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, स्थानिक नेत्यांमधील गटबाजीमुळे आता याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर न घेता प्रदेश पातळीवरून घेतला जाणार आहे. ही जबाबदारी काँग्रेसचे पुणे शहराचे प्रभारी, कोल्हापूरचे माजी आमदार सतेज पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

पुणे शहरातील काँग्रेसमध्ये दोन गट सक्रिय असून, स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी देण्यात येऊ नये, असा एका गटाचा आग्रह आहे, तर दुसऱ्या गटाकडून अनुभवी माजी नगरसेवकाची निवड करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदावरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील नेत्यांनी निर्णय घेऊ नये, अशी सूचना प्रदेश पातळीवरील नेत्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या पदाबाबतच्या निर्णयाची जबाबदारी आता माजी गृहराज्यमंत्री, पुण्याचे प्रभारी सतेज पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

इच्छुकांची नावे सतेज पाटील पाठविणार

महापालिका निवडणुकीत भाजपला ११९, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे २७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला तीन, काँग्रेसला १५, शिवसेना (ठाकरे) पक्षाला एक जागा मिळाली. शिवसेना (शिंदे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) एकाही ठिकाणी विजय मिळविता आला नाही. आता स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संख्याबळानुसार भाजपचे सात, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. या दहा जागांसाठी १९३ जणांचे अर्ज महापालिकेकडे आले आहेत. नऊ मार्च रोजी त्यापैकी दहा जणांची निवड होणार आहे.

स्वीकृत नगरसेवकाच्या एका जागेवर सहमती होत नसल्याने हा निर्णय प्रदेश पातळीवरून घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. सतेज पाटील हे इच्छुकांची नावे प्रदेश पातळीवर पाठवणार आहेत. त्यापैकीच एकाची निवड ही स्वीकृत नगरसेवक पदासाठी होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

इच्छुकांमध्ये माजी नगरसेवकांची संख्या जास्त

स्वीकृत नगरसेवकाच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये अनेक माजी नगरसेवक हे पद मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. त्यांच्याकडून प्रदेश पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. निवडणूक लढविणाऱ्या पराभूत माजी नगरसेवकांना संधी दिली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.