पुणे : लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये अपयश आल्यानंतर आता पुण्यातील काँग्रेसने तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पक्षाने घेतलेल्या ओबीसी युवक मेळाव्याला पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीच पाठ फिरवली. या मेळाव्यात ओबीसींविषयी पक्षाची भूमिका मांडण्याऐवजी तरुणांनी राजकारणात येण्याचे सल्ले नेत्यांनी दिल्याने या मेळाव्याचे फलित काय? याबाबतही काँग्रेस पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसला मागील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामागे पक्षात तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याचे पक्षवाढीला मर्यादा येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तरुणांना पक्षात घेण्यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार पुण्यात काँग्रेस भवन येथे ओबीसी युवकांचा मेळावा घेण्यात आला. मात्र, या मेळाव्याला पक्षाच्या शहरातील प्रमुख नेत्यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. तसेच अनेक नेत्यांनी पाठ फिरविली. ठरावीक पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण देण्यात आल्याचे मोजकेच नेते उपस्थित राहिल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या मेळाव्याला आमदार सतेज पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, माजी आमदार दीप्ती चौधरी, पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चंदू कदम, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, नगरसेवक प्रशांत जगताप, ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, पवन खरात, सौरभ अमराळे, हनुमंत पवार एवढेच पदाधिकारी उपस्थित होते. अन्य काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावणेच करण्यात आले नसल्याने या मेळाव्यावरून काँग्रेसमधील रुसवेफुगवे उघडकीस आले आहेत.
मेळाव्यात सल्ल्यांवर सल्ले
ओबीसी युवकांना पक्षाशी जोडणे, या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आगामी काळात काँग्रेस ओबीसींविषयी कोणती भूमिका घेणार आहे, याबाबत नेत्यांनी तरुणांना मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी तरुणांना सल्ल्यांवर सल्ले मेळाव्यात देण्यात आले. आमदार सतेज पाटील यांनी तरुणांनी राजकारणात का आले पाहिजे, यामागील भूमिका स्पष्ट केली.
विद्यार्थी, तरुणांच्या आयुष्याशी संबंधित शुल्कवाढ, शिष्यवृत्ती, मोफत बसप्रवास, नोकरी असे अनेक निर्णय राजकारणी घेतात. त्यामुळे विद्यार्थी, तरुणांनीही राजकारणात रस घ्यायला पाहिजे. तरुण कार्यकर्त्यांनी ‘रील’मध्ये न अडकता ‘रिअल लाइफ’कडे लक्ष द्यावे,’ असा सल्ला त्यांनी युवकांना दिला. राजकारण गलिच्छ आहे. त्यामध्ये पडायला नको, असा विचार प्रत्येकाने केल्यास येणाऱ्या काळात अवघड परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत सतेज पाटील यांनी तरुणांना काँग्रेस पक्षात येण्याचे आवाहन केले.
काँग्रेसने जातिधर्मापेक्षा माणुसकीला कसे प्राधान्य दिले. आता सत्ताधाऱ्यांकडून जातिधर्मांमध्ये कसा तेढ निर्माण केला जात आहे, हे तरुणांना सांगून राजकारणात येण्याचा सल्ला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. मात्र, ओबीसींबाबत काँग्रेस भविष्यात कोणती भूमिका घेणार आहे, त्यासाठी आगामी काळातील नियोजनाबाबत तरुणांना सविस्तर माहिती न दिल्याने या मेळाव्याचे फलित काय? अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे.
