पुणे : काँग्रेसने ‘संघटन सृजन’ अभियान सुरू केले असून, त्याअंतर्गत पक्षांतर्गत बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुण्यात काँग्रेसचे शहराध्यक्षपद हा कळीचा मुद्दा असून, गटबाजी रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (ठाकरे) पक्षांप्रमाणे आता काँग्रेसही पुण्यासाठी दोन शहराध्यक्ष नेमण्याचा तोडगा काढण्याची शक्यता आहे. शहरातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी प्रत्येकाकडे प्रत्येकी चार मतदार संघांची जबाबदारी देऊन मध्यममार्ग काढण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.


काँग्रेस पक्षात ‘संघटन सृजन’ मोहिमेतून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यात साडेसात हजार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार पुण्यात दोन शहराध्यक्ष नेमण्याबाबत चर्चा सुरू झाल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने दोन शहराध्यक्ष नेमले आहेत. माजी आमदार सुनील टिंगरे आणि माजी नगरसेवक सुभाष जगताप हे दोन शहराध्यक्ष आहेत. शिवसेना (ठाकरे)) पक्षाचेही संजय मोरे आणि गजानन थरकुडे हे दोन शहराध्यक्ष आहेत. त्याच धर्तीवर काँग्रेसमध्येही दोन शहराध्यक्ष नेमण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

शहराध्यक्षपदावरून चार वर्षांपासून वाद

राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसचे शिबिर झाले होते. त्या शिबिरानंतर राज्यातील काँग्रसने एक आणि दोन जून २०२२ रोजी ‘नवसंकल्प शिबिर’ शिर्डी येथे घेतले. त्यामध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ असा ठराव झाला होता. तसेच पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पदे रिक्त करावीत, असा ठरावही काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. त्यानुसार माजी आमदार रमेश बागवे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया झाली नव्हती. त्यामुळे प्रभारी अध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून पुण्यातील काँग्रेसमध्ये वाद होत राहिले आहेत. प्रभारी म्हणून काम करणारे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ब्लाॅक अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यावरून हा वाद निर्माण झाला. पूर्णवेळ अध्यक्षांना ब्लाॅक अध्यक्ष नियुक्तीचे अधिकार आहेत, प्रभारी अध्यक्षांना नाहीत, असा आरोप काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यानंतर शहर काँग्रेसमध्ये गटबाजी झाली. वेळोवेळी ही गटबाजी उफाळून आली.

प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

काँग्रेसने ‘संघटन सृजन’ अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत काँग्रेसचे राज्य पातळीवरील नेते हे पुण्यात येऊन बैठका घेत आहेत. तसेच निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियानाच्या पहिल्याच बैठकीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हे अनुपस्थित होते. त्यावरून मानापमान नाट्य घडले. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा त्यांच्याकडे पुण्यात दोन शहराध्यक्ष नेमण्याबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा ‘ही संघटनात्मक बाब आहे.’ असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. मात्र, दोन शहराध्यक्ष नेमण्याबाबतची चर्चा त्यांनी फेटाळली नाही.