पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्या आग्रहास्तव पुणे महापालिकेत समाविष्ट असलेली फुरसुंगी आणि उरळी देवाची ही गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद तयार करण्यात आली. मात्र, निवडणुकीनंतर ही नगरपरिषद महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ताब्यात गेल्याने आमदार शिवतारे यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण केंद्र चालविण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडे असून, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. आता महापालिकेने ही जबाबदारी नगर परिषदेने घ्यावी, अशी भूमिका घेतल्याने भाजपच्या या कुरघोडीने ‘राष्ट्रवादी’ची अडचण झाली असून, शिवसेना (शिंदे) बघ्याच्या भूमिकेत आहे. महायुतीतील मित्रपक्षांच्या आपापसातील राजकीय डावपेचांनी या दोन गावांचा ‘बळी’ जाण्याची वेळ आली आहे.
राज्य सरकारने पुण्याजवळील ११ गावे ही २०१७ मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट केली. त्यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे होती. मात्र, या गावांची नगरपरिषद करून त्यावर सत्ता मिळविण्याच्या उद्देशाने शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांनी व्यूहरचना आखली. पुणे महापालिकेकडून जास्त कर वसूल केला जातो आणि विकास कामे मात्र होत नाहीत, ही कारणे पुढे करून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे वगळून स्वतंत्र नगरपरिषद करण्याची मागणी केली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करत या गावांची नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकांपूर्वी ही गावे पुणे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आली. मात्र, या गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलवाहिन्यांची दुरुस्ती, जलशुद्धीकरण केंद्र चालविणे आदी कामे महापालिकेकडून करण्याचे ठरविण्यात आले.
आमदार शिवतारे यांचा डाव फसला
फुरसुंगी-उरळी देवाची नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचे मनसुबे आमदार विजय शिवतारे यांनी रचले होते. मात्र, ही नगर परिषद ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात गेल्याने आमदार शिवतारे यांचा डाव फसला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ३२ पैकी १९ जागांवर विजय मिळविला. शिवसेनेला आठ आणि भाजपच्या अवघ्या पाच जागा मिळाल्या. त्यामुळे आमदार शिवतारे यांच्यावर नामुष्कीची वेळ आली.
मित्रपक्षांमध्ये राजकीय डावपेच
ही नगर परिषद ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात गेल्यानंतर सध्या शिवसेना बघ्याच्या भूमिकेत आहे. मात्र, भाजपने कुरघोडी करण्यास सुरुवात केल्याने भाजप आणि ‘राष्ट्रवादी’मध्ये जुंपली आहे. या दोन गावांसाठीचा पाणी पुरवठा पुणे महापालिकेच्या ताब्यात आहे. ही जबाबदारी नगरपरिषदेने घेऊन पाण्याचे व्यवस्थापन करावे, असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने नगर परिषदेला पाठवले आहे. या दोन गावांसाठी तुकाई टेकडी येथे ३३ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेला दरवर्षी सुमारे २० ते २२ कोटी रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे ही जबाबदारी नगर परिषदेने घेण्याची भूमिका महापालिकेने म्हणजे भाजपने घेतली आहे. पुणे महापालिकेच्या या भूमिकेनंतर नगर परिषदेत सत्ता असलेल्या ‘राष्ट्रवादी’ने या दोन्ही गावांसाठी मंजूर असलेला २४ एमएलडी पाणी कोटा महापालिकेने नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. तसेच पूर्वीप्रमाणे दररोज १८० टँकर फेऱ्या कायम ठेवण्याची मागणी नगर परिषदेने केली आहे. भाजप आणि ‘राष्ट्रवादी’च्या या आपापसातील राजकीय डावपेचांमध्ये या दोन गावांचा पाण्याअभावी बळी जाण्याची वेळ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
