Pune Court Slams Rahul Gandhi on Savarkar Defamation case : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत भाष्य करताना भाजपा आणि स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर सावकरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात धाव घेत मानहानीचा खटला दाखल केला होता. बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राहुल गांधी यांना तीव्र शब्दांत फटकारले आहे. नेमके काय आहे त्यामागचे कारण? सुनावणीवेळी न्यायालयात नेमके काय घडले? त्याविषयीचा हा आढावा…
नेमके काय आहे प्रकरण?
राहुल गांधी यांनी २०२३ मध्ये लंडन येथील एका कार्यक्रमातून भाजपासह स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर सात्यकी सावरकर यांनी गेल्या वर्षी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती देऊन त्यांचा अपमान केला. त्यांना याची शिक्षा मिळावी यासाठी आपण न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सात्यकी सावरकर म्हणाले होते. पुणे येथील खासदार-आमदार प्रकरणांसाठी असलेल्या विशेष न्यायालयात सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने राहुल गांधींना समन्स पाठवले आणि काही वेळा हजर राहण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर या प्रकरणात त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता.
न्यायालयात सीडी निघाली रिकामी
अलीकडेच सात्यकी सावरकर हे राहुल गांधींविरोधात न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर झाले होते. तेव्हा त्यांनी राहुल यांच्या भाषणाची एक सीडी (व्हिडीओ क्लीप) न्यायालयात सादर केली. परंतु, जेव्हा ही सीडी न्यायालयात चालवण्यात आली, तेव्हा ती रिकामी असल्याचे आढळून आले. त्यावेळी सात्यकी यांचे वकील संग्राम कोल्हाटकर यांनी न्यायालयीन सुनावणी तहकूब करण्याची मागणी करीत अर्ज दाखल केला आणि सीडी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली. या तहकुबीला विरोध करताना राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयात एक अर्ज दाखल केला, ज्यामध्ये काही विशिष्ट टिप्पण्या करण्यात आल्या होत्या.
आणखी वाचा : शिंदेसेनेचा बडा नेता ठाकरे गटात; निवडणुकीनंतर महायुतीत मोठी फूट? काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी
राहुल गांधींच्या टिप्पण्या काय होत्या?
राहुल गांधी यांच्या वतीने वकील मिलिंद पवार यांनी समन्स जारी करण्यासंबंधीच्या जुन्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी २०२३ मध्ये जो समन्सचा आदेश घेतला होता, तो ठोस पुराव्यांशिवाय आणि दबाव टाकून घाईघाईने मिळवला होता, अशी टिप्पणी त्यामध्ये करण्यात आली होती. त्याशिवाय तक्रारदाराने कायदेशीर पुराव्याऐवजी मर्यादेचे उल्लंघन करून समन्स आदेश मिळवल्याची टिप्पणी या अर्जामध्ये करण्यात आली होती. या टिप्पण्यांवर सात्यकी सावरकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते.
सुनावणीवेळी न्यायालयात काय घडले?
राहुल गांधी यांच्या अर्जातील या विधानांमुळे न्यायालयाच्या निष्पक्ष कामकाजावर शंका निर्माण होत असल्याची तक्रार सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. त्यावर राहुल गांधींच्या वकिलांनी तक्रारदारांकडून खटला जाणूनबुजून लांबविण्यात येत असून पुरावे सादर करण्यात अपयशी ठरत असल्याचे स्पष्टीकरण दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमोल एस. शिंदे यांना राहुल गांधींच्या अर्जात न्यायालयाच्या कामकाजावर शंका उपस्थित केल्याचे निदर्शनात आले. त्यावेळी न्यायाधीशांनी राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या वकिलांना तीव्र शब्दांत फटकारले.
न्यायालयाने राहुल गांधींना काय निर्देश दिले?
न्यायालयाने काढलेल्या समन्सच्या आदेशाबाबत आरोपीला आणि त्यांच्या वकिलांना काही आक्षेप असल्यास त्यांनी त्याला वरच्या न्यायालयात आव्हान दिले पाहिजे. केवळ अर्जाद्वारे न्यायालयाच्या आदेशावर टिप्पणी करण्याचा अधिकार त्यांना नाही. एकतर राहुल आणि त्यांच्या वकिलांनी आदेश स्वीकारावा किंवा त्याला आव्हान द्यावे, असे स्पष्ट निर्देश न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिले आहेत. याआधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कथितरित्या आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये राहुल गांधी यांना कठोर शब्दांत फटकारले होते. स्वातंत्र्य सैनिकांविरोधात अशी टिप्पणी स्वीकारली जाणार नाही आणि अशा विधानांची पुनरावृत्ती झाल्यास स्वत:हून कारवाई करण्याचा इशारादेखील न्यायालयाने दिला होता.
हेही वाचा : भाजपा आणि शिंदे सेनेत हाणामारी, अनेक ठिकाणी दगफेकीच्या घटना; महायुतीतील संघर्ष कसा पेटला?
राहुल गांधी यांची सावरकरांविषयीची विधाने
१७ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात सभा घेतली होती. यावेळी त्यांनी सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या एका कथित पत्राची प्रत माध्यमांना दाखवली होती. सावरकरांनी ब्रिटिशांना घाबरून त्यांची माफी मागितली होती. गांधी आणि नेहरूंनी असे केले नाही आणि म्हणूनच ते अनेक वर्षे तुरुंगात राहिले, असे राहुल म्हणाले होते. २०२३ मध्येही लंडन येथील एका कार्यक्रमात राहुल यांनी वीर सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली होती. सावरकर आणि त्यांच्या पाच ते सहा मित्रांनी एकदा एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि त्यांना त्यात आनंद झाला होता, असा दावा राहुल यांनी केला होता. त्यांच्या याच भाषणाचा संदर्भ देत सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी असे काहीही लिहिले नाही आणि मुळात अशी घटना घडलीच नाही, असे सात्यकी यांनी स्पष्ट केले होते.
