सांगली : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी निवडणुक जाहीर झाली असून ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार हे अद्याप अस्पष्ट असले तरी अनेक दिग्गज या माध्यमातून विधी मंडळाच्या जेष्ठ सभागृहात जाण्यास इच्छुक आहेत. शिक्षक मतदार संघापेक्षा पदवीधर मतदार संघात महायुतीमध्येच अधिक चुरस दिसत असून भाजपने या जागेवर हक्क सांगितला असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमचाच या जागेवर हक्क असल्याचे सांगत उमेदवार जाहीर करून अश्वमेघाचा घोडा आता रणांगणात सोडला असल्याचे सांगितले आहे. यामुळे उमेदवारीसाठीची साठमारी निवडणुकीपेक्षा अधिक रोचक असणार असे दिसते.
पुणे पदवीधर मतदार संघामध्ये गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरूण लाड आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात लढत झाली होती. निवडणूक रिंगणात तब्बल ६२ उमेदवार उतरले होते.तरीही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत खर्या अर्थाने झाली होती. त्यावेळी लाड यांनी भाजपचे देशमुख यांचा पहिल्या फेरीतच ४८ हजार ८२४ मतांनी पराभव करत निवडणूक जिंकली होती. मात्र, या निवडणुकीची लाड यांनी पाच वर्षापासून सुरू केली होती. सोलापूरचे पै-पाहुणे त्यांच्या मदतीला धावून आले होते. तसेच काँग्रेसनेही कोल्हापूरच्या जयंत आसगावकर यांच्या बदल्यात चांगली मदत केली होती.
आता मात्र, मंत्री मुश्रीफ यांनी ही जागा गेल्यावेळी राष्ट्रवादीने जिंकली असल्याने आमचाच हक्क असल्याचे सांगत भैय्या उर्फ प्रशांत माने यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. एकत्रित राष्ट्रवादीचा गेल्यावेळचा विजय होता, आता मात्र दुभंगलेल्या राष्ट्रवादीचा या जागेवर हक्क कसा सांगितला जातो हे मात्र कळायला मार्ग नाही. माने यांनीही या निवडणुकीची तयारी केली असून मतदार नोंदणी जशी त्यांनी केली आहे, महायुतीमध्ये सत्तेत सहभागी असल्याने अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असेही मुश्रीफ सांगत असले तरी अश्वमेघचा घोडा सोडला आहे असे मुश्रीफ यांनी सांगलीत केलेले वक्तव्य कोणत्याही स्थितीत निवडणूक लढविणारच असे म्हणण्यासारखे आहे.
दुसर्या बाजूला अरूण लाड यांचे पुत्र आणि क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचा भाजप प्रवेश हा पदवीधर मतदार संघाची उमेदवारी देण्यावरच झाला असल्याचे सांगितले जाते. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही लाड यांना निवडणुकीची तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. भाजपमधूनच या मतदार संघातील उमेदवारीसाठी राजेश पांडे, माणिकराव पाटील चुयेकर, मकरंद देशपांडे आदी मंडळी उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे भाजपमध्येच उमेदवारीचा संघर्ष पार केल्यानंतर पुन्हा महायुतीतील जागा वाटपाचा संघर्ष यावेळी इच्छुकांना करावा लागणार आहे.
दुसर्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत शांतता असली तरी आमदार डॉ.विश्वजित कदम हे महेद्र लाड, डॉ. जितेश कदम यांच्यासाठी प्रयत्नशील राहतील असे प्रथम दशर्र्नी वाटते.तथापि, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. यामळे सध्या तरी उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप, महायुतीअंतर्गतच संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. गतनिवडणुकीवेळी एकमेकाविरूध्द लढलेले देशमुख, लाड या वेळी एकत्र दिसत आहेत. मात्र, यावेळी होणारी छुपी मदत कदम गटाकडून होणार का हाही लाड यांच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. भैय्या माने यांची उमेदवारी मंत्री मुश्रीफ महायुतीमध्ये कितपत रेटतात यावरही बरीच गणिते अवलंबून राहणार आहेत.
