पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघात भाजपला पराभव पत्कारावा लागल्याने शिक्षक मतदार संघात विजय मिळवूनही भाजपची स्थिती ही ‘एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू’ अशी झाली. अतिआत्मविश्वासच्या बळावर भाजपने पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून हिसकावून घेतल्याने प्रचाराच्या काळात ‘राष्ट्रवादी’ने तटस्थ भूमिका घेतली, तर शिवसेना (शिंदे) पक्षाने उघड आव्हान दिल्याने पुण्यात महायुतीतील मित्रपक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

लोकसभेपासून आजवरच्या सर्वच निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्याने आत्मविश्वास गमावलेल्या महविकास आघाडीला पदवीधरमधील विजयाने उर्जितावस्था आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचा करिष्मा कायम असल्याचे स्पष्ट झाले. भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव झाला. शिक्षक मतदार संघात भाजपचे कौस्तुभ गावडे हे विजयी झाले. त्यांनी शिवसेना (शिंदे) पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांचा पराभव केला.

या निवडणुकांनी महायुतीतील तिन्ही मित्रपक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. प्रचाराच्या काळात भाजपने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना विश्वासात न घेता एकट्यानेच प्रचार केल्याचा परिणाम हा पदवीधरमध्ये पहायला मिळाला. ही जागा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसची होती. गेल्या निवडणुकीत अरुण लाड हे विजयी झाले होते. मात्र, जागा वाटपात भाजपने ही जागा घेतली. ‘राष्ट्रवादी’ने या जागेसाठी फारसा आग्रह धरला नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. प्रचाराच्या काळात भाजपने ‘राष्ट्रवादी’ची दखल घेतली नाही. त्याचा परिणाम हा भाजपला भोगावा लागला. भाजपने ताकद पणाला लावूनही पराभवाला सामोरे जावे लागले. या मतदार संघात पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतील मतदार होते. अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’तील नाराजीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची जादू अद्यापही असल्याने या निकालाने स्पष्ट झाले आहे.

‘राष्ट्रवादी’च्या मतविभाजनाचा हर्षदा देशमुख-जाधव यांना फायदा?

पदवीधर मतदार संघाची जागा लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने केली होती. मात्र, जागा वाटपात या जागेवर ‘राष्ट्रवादी’ने तिलांजली दिल्याने या पक्षाचे पदाधिकारी नाराज झाले. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मतदार नोंदणीचा आढावा घेतला होता. त्यामुळे पुण्यातीही ‘राष्ट्रवादी’ने मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली होती. मात्र, ही जागा भाजपकडे गेल्यानंतर ‘राष्ट्रवादी’ तटस्थ भूमिकेत राहिली. तसेच भाजपनेही मित्रपक्ष ‘राष्ट्रवादी’ला मानाचे स्थान न दिल्याने नोंदविलेली मते दुसऱ्या ‘राष्ट्रवादी’कडे कशी वळतील, याची खबरदारी अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने घेतली. त्यामुळे महायुतीच्या मतविभाजनाचा फायदा हर्षदा देशमुख-जाधव यांना झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.\

शिवसेनेची उघड नाराजी

शिक्षक मतदारसंघात शिवसेना (शिंदे) पक्षाने मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेने त्यांची उमेदवारी मागे घेतली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे माजी खाजगी विशेष कार्य अधिकार सचिन सानप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानप यांना पाठिंबा असल्याचे जाहीर करत भाजपाला आव्हान दिले. त्यामुळे गावडे यांच्यासाठी ही लढत आव्हानात्मक झाली. भाजप आणि शिवसेना हे मित्रपक्ष समोरासमोर आल्याने त्याचे पडसाद पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमटले. शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी आमदार, रवींद्र धगेकर यांनी उघडपणे टीका केली. प्रचाराच्या काळात धंगेकर यांना रोखण्यात भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना अपयश आले. त्याचे परिणाम निकालामध्ये दिसून आले. भाजपने प्रचाराच्या काळात शिवसेनेला सन्मानाची वागणूक दिली नाही; तसेच संपर्कही साधला नसल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी याबाबतची नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि पुणे शहरातील भाजप यांच्यात पुणे महापालिकेच्या निवडणुकीपासून संघर्ष सुरू आहे. जैन बोर्डिंग प्रकरणावरून धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केले, तर कोथरूडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जाहीरपणे टीका केली. या संघर्षामुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा जागा वाटपाचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे दोन्ही मित्रपक्ष स्वबळावर लढले. शिवसेनाला पुणे महापालिकेमध्ये एकही जागा मिळू शकली नाही. माजी आमदार धंगेकर यांची पत्नी आणि मुलगा हे दोघेही पराभूत झाले.