पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषदेच्या एका जागेवर भाजपकडून दावा करण्यात येत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील चार माजी आमदार हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. उमेदवारीवरून ‘राष्ट्रवादी’च्या या माजी आमदारांमध्ये शहरी विरुद्ध ग्रामीण असा प्रादेशिक वाद उफाळून आला आहे.
या मतदार संघातून आजवर शहरी भागाला प्रतिनिधित्त्व मिळाले असल्याने आता ग्रामीण भागाला संधी देण्याचा आग्रह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील माजी आमदारांनी धरला आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये पुन्हा पक्षाला उर्जितावस्था देण्यासाठी या दोन्ही शहरांतील माजी आमदार उमेदवारीसाठी दावा करत आहेत. माजी आमदारांमध्ये प्रादेशिक वाद उफाळून आला असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कोणता मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
या मतदार संघावरून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, मागील पाच वर्षांत भाजपची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ३४४ सदस्य आहेत. त्याखालोखाल भाजपचे ३०९ आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे ६८ सदस्य आहेत. मात्र, दौंड येथील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य आणि इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’च्या सात सदस्यांच्या पाठिंब्यामुळे ३३३ जागा असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यावरून भाजप आणि ‘राष्ट्रवादी’त संघर्ष पेटला असताना, आता ‘राष्ट्रवादी’तील माजी आमदारांमध्ये प्रादेशिक वाद उफाळून आला आहे.
या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी ‘राष्ट्रवादी’कडून पुणे शहरातील माजी आमदार सुनिल टिंगरे, पिंपरी-चिंचवड शहरातील माजी आमदार विलास लांडे, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील माजी आमदार रमेश थोरात आणि दिलीप मोहिते हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
आतापर्यंत कोणाला संधी?
आतापर्यंत या मतदार संघातून पुणे शहराला मागील दोन्ही निवडणुकांमध्ये संधी देण्यात आली. माजी आमदार अनिल भोसले हे २०१० आणि २०१६ या दोन्ही वेळा निवडून आले. त्यांचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपला असला, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असल्याने या मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया थांबली होती. आता पुण्यातून वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुनिल टिंगरे यांचे नाव चर्चेत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून यापूर्वी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना संधी मिळाली. लक्ष्मण जगताप हे २००४ मध्ये या मतदारसंघातून निवडून आले. मात्र, २००९ मध्ये ते विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व असले, तरी ग्रामीण भागाला या मतदार संघातून फारसी संधी मिळालेली नाही. त्यामुळे यावेळी जिल्ह्यातील उमेदवार देण्याचा आग्रह माजी आमदारांनी धरला असल्याचे सांगण्यात आले.
