पुणे : पुणे स्थानिक स्वराज संस्था मतदार संघाच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या जागेवरून समेट न घडल्यास महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना (शिंदे) पक्षाची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे. 

ही जागा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. अनिल भोसले यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्राबल्य आहे. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांबरोबरच जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्येही भाजपचे सदस्य वाढले आहेत. त्यामुळे पक्षीय बलाबलानुसार ‘राष्ट्रवादी’नंतर दुसऱ्या स्थानावर भाजप आहे. तिसऱ्या स्थानावर शिवसेना (शिंदे) पक्ष आहे. त्यामुळे भाजपने या जागेवर दावा केला आहे. त्यावरून ‘राष्ट्रवादी’ आणि भाजप यांच्यात संघर्ष पेटला आहे.  

पक्षीय बलाबल किती?

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता भाजपचीही ताकद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ३४४ सदस्य आहेत. त्याखालोखाल भाजपचे ३०९ आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे ६८ सदस्य आहेत. मात्र, दौंड येथील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य आणि इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’च्या सात सदस्यांच्या पाठिंब्यासह ३३३ जागा असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे या जागेवरून एकमत न झाल्यास महायुतीतील भाजप आणि ‘राष्ट्रवादी’त लढत होण्याची शक्यता आहे. या दोन मित्रपक्षांमध्ये लढत झाल्यास महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाची भूमिका ही निर्णायक ठरण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेचा पाठिंबा मिळेल, त्या पक्षाचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो. त्यामुळे महायुतीतील तीन पक्ष कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

इच्छुकांची नावे चर्चेत 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून माजी आमदार सुनिल टिंगरे, रमेश थोरात, दिलीप मोहिते पाटील आणि विलास लांडे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर, माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप हे इच्छुक असल्याची चर्चा आहे. 

भाजपची पुरंदर, भोर, दौंड, मुळशीवर भिस्त 

पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. दौंंड तालुक्यात भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यामुळे भाजपला जागा मिळाल्या आहेत. मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या तीनपैकी दोन आणि पंचायत समितीच्या सहापैकी तीन जागांवर यश मिळविले. मुळशीत मान हिंजवडी या गटात भाजपने शिरकाव केला आहे. त्यामुळे भाजपची भिस्त ही पुरंदर, भोर, दौंड आणि मुळशी या तालुक्यांवर असणार आहे. 

स्थानिक आघाडींचा पाठिंबा मिळविण्याचे ‘राष्ट्रवादी’पुढील आव्हान 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ बहुतांश ठिकाणी एकत्र होते. त्याचा या पक्षांना फायदा झाला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७३ पैकी ५१ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बहुमत मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बारामती, मावळ, आबेगाव तालुक्यांमध्ये निर्विवाद यश मिळवले. इंदापूर तालुक्यात राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्र आल्याने भाजपचा निभाव लागला नाही. या ठिकाणी भाजपचे नेते प्रवीण माने यांच्या साथीला ‘राष्ट्रवादी’चे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आल्याने काही जागा मिळाल्या. मात्र, ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’ने पाठिंबा दिल्याचा भाजपचा दावा आहे. दौंड येथील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चा पाठिंबा असल्याचाही भाजपचा दावा आहे. त्यामुळे स्थानिक आघाडींंचा पाठिंबा मिळविण्याचे आव्हान ‘राष्ट्रवादी’पुढे असणार आहे. 

…तर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष 

जुन्नर आणि खेड या दोन तालुक्यांमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाला यश मिळाले आहे. जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेच्या आठपैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला, शिवसेना (शिंदे) पक्षाला तीन, तर शिवसेना (ठाकरे) गटाकडे एक जागा आहे. खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांच्यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाला यश मिळाले. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही जागा आहेत. भाजप आणि ‘राष्ट्रवादी’मध्ये जागा वाटपावरून समेट न घडल्यास निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यावेळी शिवसेना (शिंदे) पक्ष कोणती निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.