पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळाली असली, तरी ही जागा गेल्याचे शल्य मनात असल्याने महायुतीतील भाजपच्या खेळीने ‘राष्ट्रवादी’ हैराण झाली आहे. या मतदार संघातील ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना भाजपने पाठिंब्याचा ‘शब्द’ दिल्यानंतरच त्यांनी ‘राष्ट्रवादी’ जाऊन उमेदवारी स्वीकारली आहे. आता भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केल्याने काकडे यांची डोकेदुखी वाढली आहे. कंद यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाबाबत भाजपच्या नेत्यांकडून मौन पाळण्यात आल्याने आता कंद यांच्या उमेदवारीमागील ‘बोलवता धनी’ कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

या जागेसाठी महायुतीतील ‘राष्ट्रवादी’ आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत होता. ही जागा ‘राष्ट्रवादी’ची असल्याने भाजपला हक्क सोडावा लागला. मात्र, उमेदवार निवडण्यापासून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपर्यंत भाजपकडून टाकण्यात येत असलेल्या डावपेचांमुळे ‘राष्ट्रवादी’ हैराण झाल्याचे दिसत आहे. उमेदवार विक्रम काकडे यांचे वडील माजी खासदार संजय काकडे हे भाजपमध्ये सक्रिय होते.

पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत संजय काकडे यांच्यामुळे भाजपने महापालिकेत सत्ता मिळविली. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यात काकडे यांची भूमिका निर्णायक ठरली होती. विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यासाठी संजय काकडे हे प्रयत्नशील असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ‘शब्द’ दिल्याने काकडे पिता-पुत्रांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला. त्यामुळे ही जागा ‘राष्ट्रवादी’ला मिळाली असली, तरी उमेदवार हा मूळचा भाजपचाच असल्याची चर्चा करण्यात येत आहे.

प्रदीप कंद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का नाही?

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. ते पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संपर्क आहे. या मतदार संघातील बहुसंख्य मतदार हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे कंद हे उमेदवारीसाठी आग्रही होते. ही जागा ‘राष्ट्रवादी’कडे गेल्याने ते नाराज झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता ‘राष्ट्रवादी’ला प्रयत्न करावे लागणार आहे. मात्र, कंद यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला, तरीही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत भाजपकडून मौन पाळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमागे कोण आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

काकडे यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळला

उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेत महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला. काकडे यांच्या प्रतिज्ञापत्रात महापालिकेचा कर भरल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, मालमत्ता कर भरला नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून करण्यात आला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने हा आक्षेप फेटाळला. त्यानंतर काकडे यांचा अर्ज वैध ठरण्यात आला.