पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या राजकीय खेळीत काँग्रेसवर दुसऱ्यांदा एकाकी पडण्याचा कटू अनुभव आला. या निवडणुकीत जास्त मते असतानाही काँग्रेसने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला जागा दिली. मात्र, या पक्षाने उमेदवारी मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार विक्रम काकडे हे बिनविरोध निवडून आले आणि काँग्रेसवर नामुष्की ओढवली.
दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या राजकारणात काँग्रेसवर दुसऱ्यांना एकाकी पडण्याची वेळ आली. यापूर्वी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचे ठरवले. मात्र, ऐनवेळी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस अडचणीत आली.
या मतदार संघात ८६७ मते होती. त्यामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद कमी होती. या तिन्ही पक्षांचे ४७ मते होती. त्यापैकी काँग्रेसचे १९, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची १७ मते होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या चर्चेत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पक्षाकडून माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.
या मतदारसंंघासाठी पुणे महापालिकेतील १६५ नगरसेवक आणि १० स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषदेत निवडून आलेले ७३ सदस्य आणि १३ नियुक्त सदस्य, नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये निवडून आलेले ४३२ सदस्य आणि ४३ नियुक्त सदस्य, पुणे, देहूरोड आणि खडकी कॅन्टान्मेंट बोर्डात प्रत्येकी एक नियुक्त सदस्य हे मतदार होते. त्यांपैकी ‘राष्ट्रवादी’ ही ३७० मतांचा, तर भाजप ३३३ मतांचा दावा करत होती. तरीही महाविकास आघाडीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी शेवटच्या क्षणी श्रीकांत पाटील यांचा अर्ज पक्षाने मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये, लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे आणि निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य अबाधित राहावे, या व्यापक भूमिकेतून पक्षाने निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसवर नामुष्कीची वेळ आली.
विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड होण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संंवाद साधला, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी माघार घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत नाराजी दूर केल्याने सुनील टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. या राजकीय घडामोडी होत असताना काँग्रेसवर बघ्याची भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
दुसयांदा विश्वासघात?
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे पूर्व भागाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. महापालिका निवडणुका या महाविकास आघाडीकडून लढविण्याचे ठरविण्यात आले होते. दोन्ही ‘राष्ट्रवादी’एकत्र येऊन निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष असलेले जगताप यांनी जाहीरपणे विरोध केला. दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र आल्यास पदाचा राजीनामा देण्याचे त्यांनी जाहीर केले. त्या निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीकडूनच निवडणूक लढण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने स्पष्ट केले. मात्र, ऐनवेळी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र आल्या. त्यामुळे जगताप यांनी राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते काँग्रेसकडून निवडूनही आले. त्यानंतर काँग्रेसने त्यांना पूर्व भागााचे शहराध्यक्षपद दिले. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसवर एकाकी पडण्याची वेळ आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या या निर्णयाबाबत काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, ‘ही निवडणूक काँग्रेसने लढण्याची तयारी केली होती. मी त्यासाठी उमेदवार होतो. पक्षाने माझा उमेदवारी अर्जही घेतला होता. सुमारे १०० मतांची जुळवणी करण्यात आली होती. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला देण्याचा निर्णय झाला. त्यावेळी उमेदवारी मागे घेऊ नये, अशी भूमिका मी घेतली होती. मात्र, उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसपुढे काहीही पर्याय राहिला नाही. काँग्रेस पक्षाशी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विश्वासघात केला आहे.’
