पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषदेच्या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप या महायुतीतील मित्र पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. ८६७ मतांचे ‘गणित’ जुळविताना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा कस लागला आहे. आता मतांचा ‘हिशेब’ जुळविण्यासाठी नेंत्यांनी मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
या मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, मतदारांच्या मतांचे ‘गणित’ जुळविताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची दमछाक झाली आहे. या मतदार संघात ८६७ मते आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेतील १६५ नगरसेवक आणि दहा स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषदेत निवडून आलेले ७३ सदस्य आणि १३ नियुक्त केलेले सदस्य आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये सर्वाधिक ४३२ निवडून आलेले सदस्य आणि ४३ नियुक्त केलेले सदस्य आहेत. पुणे, देहूरोड आणि खडकी कॅन्टान्मेंट बोर्डात प्रत्येकी एक नियुक्त सदस्य आहे.
‘राष्ट्रवादी’ आणि भाजपच्या नेत्यांकडून हक्काच्या मतांचा हिशेब सुरू करण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी’ने त्यांच्याकडे ३७० मते असल्याचा, तर भाजपने ३३३ मते खात्रीची असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ७७१ मतांचा आकडा जुळला आहे. मात्र, अन्य मते मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना (शिंदे) पक्षाची भूमिका अद्याप अस्पष्ट
महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पक्षाचे ६७ सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आले आहेत. शिवसेनेची मते फोडण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, या मतांचे कोडे अद्याप सुटलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते कोणाला?
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद कमी असली, तरी या तिन्ही पक्षांचे ४७ सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी काँग्रेसचे १९, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ११ जण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे १७ सदस्य आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र निवडणूक लढविली होती. त्यामुळे ही मते मिळतील, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मते फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अपक्षांना महत्त्व
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २५ अपक्ष आणि २४ स्थानिक आघाड्यांचे सदस्य निवडून आले आहेत. स्थानिक आघाड्यांपैकी दौंड येथील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य आणि इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’च्या सात सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे अपक्ष सदस्यांना महत्त्व आले आहे.
भाजपने पिंपरीतील स्वीकृत नगरसेवकांची मते गमावली
या मतदार संघाच्या निवडणुकीत महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पुण्यात दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाली नसल्याने भाजपने ही हक्काची मते गमावली आहेत.
