पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तब्बल ५० वर्षांनंतर याच मतदार संघात पाटील विरूद्ध काकडे असा संघर्ष पहायला मिळणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार की, नवा इतिहास घडणार, हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील हे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष, माजी आमदार सुनील टिंगरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, तुषार कामठे आणि रणजीत जरे यांचे अर्ज अपक्ष म्हणून पात्र करण्यात आले आहेत. उमेश म्हेत्रे यांचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला. त्यामुळे आता पाटील, काकडे यांच्यासह सहा उमेदवार राहिले आहेत. चार जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार हे समोरासमोर असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१९७७-७८ च्या निवडणुकीत काय घडले?
पुणे स्थानिक स्वराज संस्थेची १९७७-७८ मध्ये चुरसीची लढत झाली होती. तेव्हा श्रीकांत पाटील यांचे वडील माजी आमदार वि. भा. पाटील हे तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात दिवंगत खासदार संभाजीराव काकडे हे उमेदवार होते. काकडे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बारामतीतील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी होते. पवार हे वि. भा. पाटील यांच्या बाजूने उभे राहिले. त्या निवडणुकीत पाटील हे काकडे यांचा पराभव करून निवडून आले. आता पवार यांच्या आदेशानंतर श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे हे उमेदवार आहेत. हे काकडेदेखील मूळचे बारामतीचे असले, तरी सध्या त्यांचे कार्यक्षेत्र पुणे शहर आहे. मात्र, ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या मतदारसंघात पुन्हा एकदा पाटील विरूद्ध काकडे अशी लढत होणार आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नवीन इतिहास घडणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
प्रदीप कंद यांच्या माघारीसाठी प्रयत्न
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आता कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काकडे यांच्याकडून प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. कंद हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून, त्यांचा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जनसंपर्क आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर मतविभाजनाचा फटका काकडे यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंद यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
