पुणे : पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या दोन नगरसेवकांच्या प्रभागांना शून्य विकास निधी दिल्यावरून महायुतीतील भाजप आणि ‘राष्ट्रवादी’ यांच्यात सुरू असलेला वाद मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील शिष्टाईनंतर संपुष्टात आला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये दिलजमाई झाली. मात्र, आता दोन नगरसेवकांपैकी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी राजकीय वैर असलेले नगरसेवक अमोल बालवडकर यांना निधी देण्यावरून पुन्हा या मित्रपक्षांमध्ये धुसफूस सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांच्यात दोन नगरसेवकांना शून्य विकासनिधी देण्यावरून वाद झाला. त्यानंतर या वादाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी संबंधितांची कानउघाडणी केली. तसेच उपमुख्यमंत्री पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर महायुतीतील या दोन पक्षांमध्ये दिलजमाई झाली. मात्र, या वादाचा कारणीभूत ठरलेले ‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक अमोल बालवडकर यांना पुन्हा विकासनिधी द्यायचा की नाही, यावरून आता पुन्हा दोन्ही मित्रपक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

नेमका वाद कशामुळे ?

कोथरूड विधानसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून चौकशीचा प्रस्ताव बालवडकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिला. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला. बालवडकर यांनी हा प्रस्ताव दिल्याने भाजपच्या सदस्यांनी बालवडकर यांना वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावाचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्य करून घेतला. विरोधी पक्ष असलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांनी विरोध केला. मात्र, मतदान घेऊन भाजपने हा प्रस्ताव मान्य केला. या ठरावावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणारे ‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक, माजी आमदार सुनील टिंगरे यांचे बंधू यांच्या प्रभागासाठी असलेले १२ कोटी रुपयांच्या निधीचेही वर्गीकरण करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याही प्रभागाला शून्य निधी झाला. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशांनंतर दिलजमाई झाली आहे. मात्र, बालवडकर यांच्यामुळे आता पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.

टिंगरेंचे एक पाऊल मागे, बालवडकर अडचणीचे ?

नगरसेवक सुहास टिंगरे यांनी एक पाऊल मागे घेत नमती भूमिका घेतल्याने त्यांना पुन्हा निधी देण्यास भाजपने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जाहीरपणे टीका केल्याने भाजप हे बालवडकरांबाबत भूमिका बदलण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांसाठी बालवडकर हे आता अडचणीचे झाले आहेत.