पुणे : पुणे महापालिकेत काँग्रेसच्या वाट्याला येणारे एक स्वीकृत नगरसेवकपद हे सध्या चर्चेचा विषय झाला असून, स्थानिक नेत्यांमध्ये समेट न घडल्याने राज्य पातळीवरील तीन नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मात्र, त्यातूनही तोडगा निघण्याची शक्यता नसल्याचे लक्षात येताच आता इच्छुकांनी दिल्ली दरबारी नेत्यांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे.
इच्छुकांमध्ये माजी आमदारपुत्राबरोबरच ज्येष्ठ नगरसेवक असल्याने येत्या सोमवारी कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एका जागेसाठी ६८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये माजी आमदार रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे, माजी नगरसेविका लता राजगुरू, काँग्रेसचे राज्य प्रवक्ते व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष नीता रजपूत, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र किराड; तसेच माजी नगरसेवक अजित दरेकर, सुनील मलके, कैलास गायकवाड आदी प्रमुख दावेदार आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव, राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन आणि वीरेंद्र जगताप या तीन नेत्यांनी शुक्रवारी ६४ जणांच्या मुलाखती घेतल्या. स्वीकृत नगरसेवकपदासाठी प्रमुख इच्छुकांपैकी बागवे यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या पत्नी इंदिरा बागवे यांनाही उमेदवारी मिळाली. मात्र, दोघांचाही पराभव झाला. अविनाश बागवे अवघ्या ६२ मतांनी पराभूत झाले, तर इंदिरा बागवे यांना २३२ मतांनी पराभव पत्करावा लागला. लता राजगुरू या ज्येष्ठ माजी नगरसेविका आहेत. या निवडणुकीत त्यांचे पुत्र कुणाल राजगुरू यांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला.
नीता रजपूत आणि वीरेंद्र किराड हे दोघे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. रजपूत या १९९२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्या. त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपदही मिळाले. मात्र, त्यानंतर त्यांना महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळाले नाही. किराड गेल्या दोन निवडणुकांत पराभूत झाले आहेत. माजी नगरसेवक गोपाळ तिवारी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते आहेत. ते १९९२ मध्ये नारायण पेठ या भाजपच्या वॉर्डातून अपक्ष निवडून आले होते. मूळचे काँग्रेसचे असल्याने जिंकून आल्यावर ते काँग्रेसचे सहयोगी सभासद झाले. तेदेखील या पदासाठी दावेदार आहेत. अजित दरेकर यांची गेल्या निवडणुकीत स्वीकृत म्हणून निवड करण्यात आली होती. सुनील मलके आणि कैलास गायकवाड हे २०१२ मध्ये नगरसेवक होते. या प्रमुख उमेदवारांसह पक्षाचे अन्य पदाधिकारीही इच्छुक आहेत.
इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या तीन नेत्यांकडून याबाबतचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर आठ मार्चला स्वीकृत सदस्याचे नाव प्रदेश कार्यालयाकडून शहर काँग्रेसला कळविण्यात येईल. नऊ मार्चला संबंधित उमेदवाराचे नाव महापालिका आयुक्तांकडे दिले जाणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
