पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याची पत्नी, माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी मुलाखत दिली आहे. तसेच कौटुंबिक वादातून खून झालेल्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नागरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ उमेदवारी देणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र लढण्याची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’कडे इच्छुकांची रांग लागली आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे या पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक दहा (बावधन- भुसारी कॉलनी) या प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी जयश्री मारणे यांनीही मुलाखत दिली. जयश्री मारणे या २०१२ च्या महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढविण्यात इच्छुक आहेत. गजानन मारणे याला कोथरूडमध्ये अभियंता असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यामध्ये त्याची जामीनावर सुटका झाली आहे.

पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात काही नावे सातत्याने चर्चेत राहिली आहेत. त्यामध्ये कुख्यात गुंड गजानन मारणे हा आहे. त्याचे कार्यक्षेत्र कोथरूड परिसर आहे. मारणे हा ‘महाराज’ या नावाने या भागात ओळखला जातो. मारणे याचे राजकीय क्षेत्रात लागेबांधे आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही कार्यक्षेत्र कोथरूड परिसर आहे.

आंदेकर पुन्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार?

आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याची भावजय माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सून सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारीअर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, भाषण, घोषणाबाजी करू नयेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी पोलीस बंदोबस्तात शनिवारी दुपारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणण्यात आले. त्या वेळी आंदेकरने घोषणाबाजी केली. तिघांच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी असल्याने अर्ज स्वीकारण्यात आले नाहीत. तिघांना पुन्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणले जाण्याची शक्यता आहे.

वनराज आंदेकर हे २०१७ च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यांच्या प्रभागातून लक्ष्मी आंदेकर यादेखील निवडून आल्या होत्या. लक्ष्मी आंदेकर या माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांच्या पत्नी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित (पवार) पक्ष सोनाली आणि लक्ष्मी या दोघींना उमेदवारी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.