पुणे : भाजप आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांची युती असली, तरी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपामध्ये विश्वासात घेण्यात येत नसल्याने भाजपबरोबर युती करण्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’बराेबर आघाडी करण्याची तयारी आठवले गटाने सुरू केली आहे.

जागा वाटपासाठी भाजप आणि ‘भारिप’ यांच्यात आतापर्यंत एकच बैठक झाली असून, जागांबाबत वाटाघाटी करण्यास भाजपकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने ‘भारिप’ने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

भाजप आणि ‘भारिप’ आठवले गट यांची युती आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांची जागा वाटपाबाबत एक बैठक झाली. त्यामध्ये ‘भरिप’ने ३० जागांची मागणी केली. मात्र, त्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दर्शविला. त्यानंतर नव्याने यादी देण्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आले. मात्र, त्यानंतर जागा वाटपासाठी बैठक घेण्यास भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे ‘भारिप’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’बरोबर आघाडी करण्याची तयारी ‘भारिप’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुरू केली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

दोन नेत्यांच्या विरोधाने गटबाजी

अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’बरोबर आघाडी करण्याबाबत ‘भारिप’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेवून चर्चा केली. त्या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आघाडी करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, दोन नेत्यांनी विरोध केला आहे. त्यावरून ‘भारिप’मध्ये दोन गट पडले आहेत. भाजपकडून कानाडोळा करण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाबरोबर आघाडी करण्याचा आग्रह काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, संबंधित दोन नेत्यांनी केंद्र आणि राज्यात भाजपबरोबर युती असल्याने हा निर्णय घेण्यास विरोध करत आहेत. त्यावरून ‘भारिप’मध्ये गटबाजी सुरू झाली असल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

भाजपचे दुर्लक्ष

गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ‘भारिप’चे तीन नगसेवक निवडून आले. डॉ. सिद्धार्थ धेंंडे, सुनीता वाडेकर आणि नवनाथ कांबळे या तिघांचा समावेश होता. कांबळे यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या कन्या हिमाली कांबळे या निवडून आल्या. ‘भारिप’च्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. वाडेकर यांना उपमहापौर पदही भाजपने दिले. मात्र, या निवडणुकीत भाजपकडे अन्य पक्षांतील इच्छुकांची रांग असल्याने भाजपकडून ‘भारिप’कडे दुर्लक्ष करत येत असल्याची ‘भारिप’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना झाली आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’बरोबर जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून चर्चा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, गेल्या रविवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पुण्यात संकल्प मेळावा घेण्यात आला. त्या मेळाव्यात आठवले यांनी ‘भारिप’ला १२ देण्याची मागणी केली. या मेळाव्याला उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांनी सत्तेत ‘भारिप’ला योग्य स्थान दिले जाईल, असे आश्वासन दिले. भाजपने जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यावर सोपविली आहे. जागा वाटपाबाबतची पहिली बैठक झाली असून, दुसऱ्या फेरीसाठी भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ‘भारिप’ वेगळा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.