पुणे : महापालिका निवडणुका जवळ येऊ लागताच अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे इच्छुक म्हणून चर्चेत येऊ लागताच निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक निष्ठावंत हे पक्षांतराच्या किंवा बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याने सर्वपक्षीय आमदारांची ही घराणेशाही पक्षांच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घराणेशाहीला थारा नसल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली जाणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे कोथरुडमधील मयूर कॉलनी या प्रभागाचे नगरसेवक होते. त्यामुळे ही जागा आपल्या कुटुंबाकडे कायम ठेवण्याकडे त्यांचा कल असणार आहे. त्यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ यांचे नाव आता चर्चेत येऊ लागले आहे. दुष्यंत मोहोळ यांच्याकडे भाजप युवा मोर्च्याच्या शहराध्यक्ष पदाचीही धुरा देण्यात आाली आहे.
भाजपच्या विद्यमान आमदारांपैकी राज्याच्या नगरविकास, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पर्वती भागात प्रभुत्व आहे. त्यांनीही या भागातून नगरसेविका म्हणून काम पाहिले आहे. या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव करण मिसाळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांनीही पुणे महापालिकेत नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष या पदावर काम केले आहे. आता त्यांच्या कन्या सुप्रिया कांबळे यांना संधी देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रंजना टिळेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नगरसेविका टिळेकर यांनी यापूर्वी तीनवेळा पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केले आहे.
भाजपच्या माजी आमदारांपैकी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक हे इच्छुक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माजी आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक हे माजी नगरसेवक आहेत. सलग दोनवेळा ते निवडून आले आहेत. यावेळी ते ‘हॅटट्रीक’ साधण्याची शक्यता आहे.
भाजपबराेबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्याही कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यांचे चिरंजीव इशान तुपे यांच्या नावाची चर्चा आहे. तुपे कुटुंबाला राजकीय वारसा आहे. चेतन तुपे यांचे वडील दिवंगत खासदार विठ्ठल तुपे यांनी पुणे शहराचे नेतृत्त्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार सुनील टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे हे उमेवारीसाठी दावेदार आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर किंवा चिरंजीव प्रणव धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तत्कालीन शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार हे माजी नगरसेवक आहेत. सध्या ते शिवसेना (ठाकरे) पक्षात आहेत. ते उमेदवार असणार आहेत. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे पुतणे योगेश मोकाटे हेदेखील शिवसेना (ठाकरे) पक्षात असून ते उमेदवारीसाठी दावेदार असणार आहेत. योगेश मोकाटे हेदेखील माजी नगरसेवक आहेत.
सर्वपक्षीय आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे उमेदवार म्हणून चर्चेत येऊ लागल्याने अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षाचे काम करणारे पदाधिकारी हे अस्वस्थ झाले आहेत. त्यापैकी काही इच्छुकांनी पक्षांतराची तयारी सुरू केली असून काहींनी बंडखोरी करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय आजी-माजी आमदारांची घराणेशाही ही पक्षांच्या मुळावर येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
