पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ‘जनता दरबार‘ भरून पुन्हा एकदा पक्षाला उभारी देण्यास सुरुवात केली असली, तरी पुण्यातील या पक्षाचा कारभार हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वीय सहायकांच्या हाती सोपविण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाचे पुण्यातील स्थानिक नेते हे नाममात्र झाले आहेत. या उपक्रमाने पक्ष अधिक जोमाने कामाला लागण्याऐवजी पक्षांतर्गत नाराजीला जनता दरबारच कारणीभूत ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशानुसार दर सोमवारी ‘जनता दरबार’ भरविण्याचे ठरविण्यात आले आहे. या उपक्रमाला १६ मार्चपासून सुरुवात करण्यात आली. २३ मार्च रोजी सलग दुसऱ्या सोमवारी ‘जनता दरबार’ भरण्यात आला आहे. पक्षाच्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात होणाऱ्या या जनता दरबाराला पक्षाचे स्थानिक नेते हजेरी लावत असले, तरी ते नाममात्र असल्याचे दिसून येते. सर्व कारभार हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वीय सहायकांच्या हाती सोपविण्यात आला आहे. नागरिकांच्या समस्या सोडविणे, नागरिकांचे अर्ज किंवा निवेदने स्वीकारण्याचे काम स्वीय सहायक हे करत आहेत. त्यामुळे पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची मूक उपस्थिती असल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष दु:खाच्या सावटाखाली असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सध्या नैराश्येमध्ये आहेत. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी स्थानिक पदाधिकारी हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबरोबर असले, तरी स्वीय सहायकांचा कारभारात हस्तक्षेप वाढल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असल्याचे काही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी घट्ट करण्यासाठी जनता दरबाराचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, पदाधिकारी हे बघ्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे या उपक्रमातून पक्ष पुन्हा जोमाने कामाला लागण्याऐवजी पक्षांतर्गत नाराजीला जनता दरबारच कारणीभूत ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची ‘जनसंवादा’ला उपस्थिती
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे ‘जनसंवादा’ला पुन्हा सुरुवात केली आहे. या जनसंवादामध्ये त्या स्वत: उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधत असतात. ‘जनसंवादा’ला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सदस्यांशी संवाद साधल्यानंतर आता त्यांनी ‘जनसंवाद ’ सुरू केला आहे.
