पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दु:खात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने आता पुण्यात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने दर सोमवारी ‘जनता दरबार’ भरविण्याचा निर्णय घेतला आहे. या जनता दरबाराला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित राहणार असून, त्याची सुरुवात १६ मार्चपासून केली जाणार आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष दु:खाच्या सावटाखाली आहे. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सध्या नैराश्येमध्ये आहेत. मात्र, आता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचा आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला आहे. त्याची सुरुवात म्हणजे दर सोमवारी पक्षाकडून ‘जनता दरबार’ भरविण्यात येणार आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षाचा आधारवड हरपल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी विस्कळीत झाली आहे. या कठीण काळात पक्षाला सावरण्याची धुरा आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुण्यात दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी दोन या कालावधीत ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येणार आहे. पक्षाच्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात हा जनता दरबार भरवून नागरिकांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. शहराध्यक्ष, माजी आमदार सुनिल टिंगरे, माजी नगरसेवक सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रुपाली पाटील- ठोंबरे,अक्रूर कुदळे आणि हाजी फिरोज शेख यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे. या जनता दरबाराच्यावेळी प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच नागरिकांच्या तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचाही ‘जनसंवाद’
राज्याचे दिवंंगत उपुमख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पक्षबांधणीसाठी सुनेत्रा पवार या सक्रिय झाल्या आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सदस्यांशी संवाद साधल्यानंतर आता त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे ‘जनसंवाद ’ साधण्यास सुरुवात केली आहे. बारामती येथे त्यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी सोडविल्या आहेत. त्यानुसार आता पुण्यात दर सोमवारी ‘जनता दरबार’ भरविला जाणार आहे.
