पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सातत्याने पक्षांतर्गत वाद उफाळून येत आहेत. हे वाद मिटविण्याचे काम आता पक्षाचे सरचिटणीस, खासदार पार्थ पवार यांना करावे लागत असून, ते मध्यस्थीची भूमिका बजावू लागले आहेत.
विधान परिषद आणि पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावरून डावलण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात वाद निर्माण झाला. पक्षाचे पश्चिम भागाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जगताप यांनी पक्षाच्या सामजिक न्याय विभागाच्या पश्चिम भागासाठी नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने वादाला तोंड फुटले. हा वाद थेट खासदार पार्थ पवार यांच्यापर्यंत पोहोचला. खासदार पार्थ पवार यांनी या निर्णयाला स्थगिती देत समेट घडवून आणला. मात्र, या प्रकरणावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष जयदेव इसवे हे गेल्या २७ वर्षांपासून पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केली. मात्र, सुभाष जगताप यांनी या विभागाच्या पश्चिम भागासाठी शहराध्यक्षपदी किशोर कावरे यांची नियुक्ती केली. त्यावरून नाराज झालेल्या इसवे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे प्रकरण खासदार पार्थ पवार यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी याबाबतची माहिती घेतल्यानंतर नवीन नियुक्तीला स्थगिती देण्याचा आदेश दिला. मात्र, या प्रकरणाने ‘राष्ट्रवादीं’तील वाद उफाळून आला.
याबाबत इसवे म्हणाले, ‘जगताप यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी प्रदेश पातळीवरून परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, प्रदेशाध्यक्षांची परवानगी न घेता निर्णय घेतला. जगताप यांनी पश्चिम विभागाची कार्यकारिणी जाहीर केलेली नाही. मात्र, फक्त सामाजिक न्याय विभागाच्या पश्चिम भागाचे नवीन शहराध्यक्ष म्हणून कावरे यांची निवड केली. खासदार पार्थ पवार त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.’
यापूर्वीही नाराजीचा प्रकार
शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी पश्चिम विभागाची कार्यकारिणी जाहीर न केल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा आरोप करून पक्षाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारले. गाडे हे जगताप यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पर्वती विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनीही जगताप यांच्याविरोधात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हा दुसरा प्रकार घडला असल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आता खासदार पार्थ पवार यांनी पुण्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
