पुणे : विलीनीकरण आणि पक्षातून खासदार, आमदार फुटण्याच्या अफवा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने पुण्यात भाकरी फिरविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कोणत्या जुन्या पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीतून डच्चू मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पुण्यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका नसल्या, तरी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा विचार करून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कामाला सुरुवात करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. तसेच राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीत लवकरच बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. संघटना अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी हे फेरबदल आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार पिंपरीतील शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. आता पुणे शहर कार्यकारिणीमध्ये कोणते बदल होणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.


पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यानंतर पक्षनिरीक्षक म्हणून प्रवक्ते सुनील माने यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्याशी सल्लामसलत करून पिंपरी-चिंचवड शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.

पुण्यातील कोण पायउतार होणार?

पुणे महापालिकेच्या निवडणुका दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुण्याचे प्रभारी शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर आता पाटील यांच्याकडे पूर्णवेळ शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानंतर श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. पाटील वगळता पुण्यातील कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रस्थापित पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कोणाला पायउतार व्हावे लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

१५ ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरे

पुणे महापलिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तीन नगरसेवक आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तीन वर्षांचा कालावधी असला, तरी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पक्षाने नियोजन केले आहे. त्यासाठी पक्षाचे खासदार आणि आमदार १५ ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरे करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापल्या कार्यक्षेत्रात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सक्रिय होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र, त्याचवेळी संघटनात्मक पातळीवर बदल होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे पुण्यात अनेक वर्षे पदांवर असलेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.