पुणे : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आता पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यासाठी भाजप तयारीला लागली असताना महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाही मैदानात उतरणार आहे. त्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयारी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदार संघात भाजप आणि ‘राष्ट्रवादी’ या मित्रपक्षांमध्येच संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात पुण्याबरोबरच सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या मतदार संघाच्या २०२० च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड हे विजयी झाले होते. त्यावेळी महाविकास आघाडीतील तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून निवडणूक लढविली होती. त्यामुळे लाड हे विजयी झाले होते. ही सल भाजपच्या मनात कायम असल्याने भाजपने हा मतदार संघ पुन्हा काबीज करण्यासाठी जोमाने तयारी सुरू केली आहे.
भाजपकडून या मतदार संघाचे नेतृत्त्व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत पराभव झाल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी भाजपने पक्षीय पातळीवर व्यूहरचना आखली आहे.
भाजपकडून ‘मतदार नोंदणी प्रमुख’ नियुक्त
पुण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन पदवीधर मतदार संघांमध्ये आगामी दोन महिन्यांत निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत पुण्यातून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, नागपूरमधून काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि छत्रपती संभाजीनगरमधून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हे विजयी झाले होते. आता हे तिन्ही मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने आखणी सुरू केली आहे. भाजपने प्रत्येक मतदार संघासाठी ‘मतदार नोंदणी प्रमुख’ नियुक्त केले आहेत. पुणे पदवीधर मतदार संघासाठी सरचिटणीस राजेश पांडे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी आमदार संजय केनेकर आणि नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.
भाजपच्या नगरसेवकांना मतदार नोंदणीसाठी लक्ष्य
पुणे पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी करताना भाजपने प्रत्येक नगरसेवकाला मतदार नोंदणीचे लक्ष्य दिले आहे. पुण्यातील प्रत्येक नगरसेवकाने किमान १५००, तर पिंपरीत ५०० मतदारांची नोंदणी करण्याचे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. त्यादृष्टीने भाजपचे नगरसेवक कामाला लागले आहेत.
‘राष्ट्रवादी’च्या बैठका
आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने शहर आणि जिल्हानिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी (११ सप्टेंबर) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी किती मतदारांची नोंदणी करण्यात आली, याचा आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
