पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात घराणेशाहीला बळकटी आणण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (पीडीसीसी) निवडणूक कारणीभूत ठरली आहे. या बँकेच्या संचालक पदासाठी पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी आपापल्या कुटुंबातील वारसदारांच्या राजकीय पटलावर नोंदी करून ठेवल्या आहेत. संचालक पदासाठी सहकारी संस्थांमधून नेमण्यात येणाऱ्या मतदार प्रतिनिधींसाठी कुटुंबातील व्यक्तींची नावे सुचविल्याने जिल्ह्यात घराणेशाहीचा पाया आणखी घट्ट झाल्याची चर्चा राजकीत वर्तुळात सुरू झाली आहे.

पुणे जिल्ह्याचे राजकारण आणि अर्थकारणाच्या केंद्रस्थानी कायम ‘पीडीसीसी’ बँक असते. त्यामुळे या बँकेचे संचालकपद हे जिल्ह्याच्या राजकारणात सन्मानाचे मानले जाते. या बँकेवर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. या बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ येत्या डिसेंबर महिन्यात संपणार असल्याने नवीन संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. संचालक मंडळ निवडणुकीसाठी सहकारी संस्थांना मतदान प्रतिनिधी पाठवायचा असतो. त्यासाठी २२ सप्टेंबर मुदत होती. त्यानुसार सहकारी संस्थांनी आपापल्या क्षेत्रातील प्रतिनिधीं ची निवड करून त्याबाबतचे ठराव पाठविले आहेत. तीन जानेवारी २०२७ रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

नेते अस्वस्थतेचे कारण काय?

राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे लातूर जिल्हा सहकारी बँकेचे संचालकपद भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमभंगाची कारवाई करत रद्द केल्यामुळे ‘पीडीसीसी’ बँकेवर संचालक असलेल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियावलीनुसार बँकेच्या संचालक मंडळावर कोणतीही व्यक्ती सलग दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक म्हणून राहू शकणार नाही. तसेच सलग दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर संचालकाला किमान तीन वर्षांचा ‘कूलिंग ऑफ’ कालावधी म्हणजेच विश्रांतीचा काळ पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. राज्याच्या सहकार कायद्यात याबाबत तरतूद नसल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचेच पद रद्द करण्यात आल्यामुळे पुणे जिल्ह्यातील नऊ ज्येष्ठ नेत्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नऊ विद्यमान संचालकांना फटका?

‘पीडीसीसी’ बँकेच्या संचालक पदावर दहा वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलेल्यांमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार संग्राम थोपटे आणि बँकेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, आप्पासाहेब जगदाळे, संजय काळे, रेवणनाथ दारवटकर यांचा समावेश आहे. ते निवडणूक लढविण्यास पात्र ठरण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ नेत्यांचे वारसदार कोण?

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह चिरंजीव खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावांचा प्रस्ताव बारामतीतील सहकारी संस्थांच्या मतदार प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आला आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांचा मतदान प्रतिनिधी म्हणून ठराव पाठविला गेला आहे. श्रीराज भरणे हे इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समितीत सदस्य आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांचा नावाचा प्रस्ताव आंबेगावातील लाखणगाव येथील सोसायटीतून पाठविण्यात आला आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची कन्या प्राजक्ता दुर्गाडे यांच्या नावाचा प्रस्ताव आहे. त्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. दौंड तालुक्यातून आमदार राहुल कुल यांच्यासह पत्नी कांचन कुल यांच्या नावांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

महायुतीतील मित्रपक्षांत संघर्ष?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला आहे. या बँकेवर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले असताना भाजप शिरकाव करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यातच संघर्ष होण्याची शक्यता आहे. पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे दोघेही भाजपवासी झाले आहेत. ते बँकेचे विद्यमान संचालक आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजपने या बँकेत शिरकाव करण्याची व्यूहरचना आखली आहे.

भाजपकडून राज्याच्या विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांचे चिरंजीव ॲड. निरंजन डावखरे यांचा मतदार प्रतिनिधी म्हणून शिरुरमधील हिवरे सहकारी सोसायटीमार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ॲड. डावखरे हे कोकण पदवीधर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.