पुणे : राज्यात महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) हे तीन पक्ष एकत्र नांदत असले, तरी पुण्यात महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपकडून सातत्याने कुरघोड्यांचे राजकारण केले जात आहे. आता ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ हा उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेने शहरभर लावलेल्या फलकांवर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना स्थान न दिल्याने भाजप-‘राष्ट्रवादी’तील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपने राजशिष्टाचार पाळला नसल्याचा ‘वार’ मित्रपक्ष ‘राष्ट्रवादी’ने केल्याने समता, बंधुता, सेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या वारीवरूनच महायुतीतील मित्रपक्षांत अंतर्गत ‘वॉर’ पेटले आहे.

पुणे महापालिकेत भाजपचे बहुमत असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष हा विरोधी पक्ष आहे. महापालिकेचे कामकाज करताना बहुतांश निर्णय हे महायुतीतील हे दोन्ही पक्ष हे संगनमताने घेत आले आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाचा एकही नगरसेवक नसल्याने या पक्षाला महायुतीतील हे दोन्ही पक्ष विचारात घेत नसल्याचे दिसून येते. पुण्यात भाजपला बहुमत असले, तरीही निर्णय घेताना महायुतीतील मित्रपक्ष म्हणून ‘राष्ट्रवादी’ला सहभागी करून घ्यावे लागत असल्याने भाजप हा सातत्याने ‘राष्ट्रवादी’वर कुरघोड्या करत आला आहे.

पुणे महापालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांच्या नियुक्तीवरूनही भाजपने ‘राष्ट्रवादी’ची अडचण केली. महापालिकेच्या १५ प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडीप्रक्रियेच्यावेळी भाजपने क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेत फेरबदल करून एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्न केला. प्रभाग समित्यांच्या रचनेत आणि सीमांकनात हस्तक्षेप केल्याची तक्रार ‘राष्ट्रवादी’च्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर पेचप्रसंग निर्माण झाला. वाटाघाटींनंतर १५ पैकी १३ प्रभाग समित्यांवर भाजपने वर्चस्व राखले. महायुतीमुळे भाजपला ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या एक प्रभाग समितीचे अध्यक्षपद ‘राष्ट्रवादी’ला द्यावे लागले.

महापालिकेच्याअर्थसंकल्पामध्येही ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांसाठी निधीची तुटपुंजी तरतूद करण्यात आली होती. त्यावरूनही भाजप आणि ‘राष्ट्रवादी’त संघर्ष झाला होता. तेव्हा ‘राष्ट्रवादी’च्या स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांना समाधानकारक निधी मिळू शकला होता.

नवा वाद काय?

भाजप आणि ‘राष्ट्रवादी’त सातत्याने वाद उफाळून येत असताना आता ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’च्या जाहिरात फलकांवर लावण्यात आलेल्या छायाचित्रांकडून वाद निर्माण झाला आहे. भाजपने जाहिरात फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच स्थान दिले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्रांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यावरून महापालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. महापौर नागपुरे यांनी राजशिष्टाचार पाळला नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर महापौर नागपुरे यांनी ही बाब जाणीवपूर्वक करण्यात आली नसून, ही चूक झाल्याचे उशिरा लक्षात आले. याबाबत संबधितांना समज देण्यात आली असल्याचे स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकारावरून भाजप-‘राष्ट्रवादी’त ठिणगी पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.