पुणे : पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक असलेल्या प्रभागांना कमी विकास निधी देण्यात आल्याने ‘राष्ट्रवादी’ आणि भाजपमध्ये वाद उफाळून आला आहे. या वादाची दखल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयाची आठवण करून दिली आहे.
पुणे महापालिकेचा २०२६-२७ या वर्षाचा १५,६६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केला असून, त्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. मात्र, नगरसेवकांना आपापल्या प्रभागांमध्ये विकासकामे करण्यासाठी निधी देण्यात भाजपने दुजाभाव केल्याच्या तक्रारी ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्या आहेत. त्याची दखल सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या वास्तवतेची जाणीव करून दिली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या पत्रात काय?
‘केंद्र आणि राज्यात महायुती म्हणून एकत्र काम करत आहोत. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सत्ताधारी आणि मित्रपक्षांच्या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निधीचे वाटप करणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन, रस्ते विकास आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत गरजा राजकीय पक्षांच्या सीमांपलीकडे आहेत. कोणत्याही एका प्रभागाला झुकते माप मिळाल्यास दुसऱ्या भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहू शकतात. तरी ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयानुसार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या प्रभागासाठी समान निधी उपलव्ध व्हावा. त्यासाठी संबंधितांना योग्य ते निर्देश व्हावेत, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
निधीचे वाटप कसे?
नगरसेवकांना आपापल्या प्रभागांमध्ये विकासकामे करण्यासाठी अर्थसंकल्पात निधीचे वाटप करताना भाजपने राजकारण केल्याच्या तक्रारी ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांनी केल्या आहेत. भाजपच्या नगरसेवकांना प्रत्येकी पाच ते आठ कोटी रुपयांचा निधी, तर ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांना तीन ते चार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ने निवडणूक लढविली नाही. त्यामुळे या तिन्ही महत्त्वाच्या पदांवर भाजप-आरपीआय युतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भाजपने ‘राष्ट्रवादी’ला सत्तेत योग्य वाटा दिला पाहिजे, असे राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले.
