पुणे : पुण्यात सुरू असलेली पुणेकर आणि विद्यार्थ्यांची आंदोलने; तसेच काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ने मरगरळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसचा ‘आव्वाज’ अल्पकाळ वाढला. आता गणेशोत्सवात डीजेच्या आवाजावरून विरोधाचे वारे घोंगावू लागले असताना ही संधी साधण्याऐवजी पुण्यातील काँग्रेस पुन्हा निद्रितावस्थेत गेल्यासारखी झाली आहे. याउलट बदलत्या वातावरणाने खडबडून जागे झालेल्या भाजपने ‘सामूहिक वंदे मातरम्’ आणि प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन विरोधाची धार बोथट करत परिस्थिती पूर्ववत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, अद्यापही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने भाजपची अस्तित्त्वासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुण्यात गेल्या महिनाभरापासून वेगवेगळी आंदोलने, मोर्चे सुरू आहेत. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला प्रतिसाद मिळणार असल्याचा अंदाज भाजपला आला होता. भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून पुणेकरांचे लक्ष भाजपकडे वेधण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाच्या पूर्वसंधेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नॅनशल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओइपी) वसतिगृहात वाद झाला. त्यानंतर ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या दिवशीच भाजपने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सामूहिक वंदे मातरम् उपक्रम घेतला. त्यालाही प्रतिसाद लाभला. मात्र, ‘छात्रों की गूंज’द्वारे पुण्यातील काँग्रेसला उभारी मिळाली.

‘छात्रों की गूंज’नंतर एकामागोमाग एक आंदोलने होत राहिली. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळले. त्यातून तोडगा निघाला असतानाच गणेशोत्सवात डीजेच्या आवाजावरून वादाची ठिणगी पडली. पुणे महापालिका भवनात पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत डीजेच्या आवाजावरून विद्यानंद बापट हे म्हणणे मांडत असताना त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले आणि बापट हे चर्चेत आले. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांंचे ‘बापट यांना गल्लीत कुत्रेही ओळखत नाही’ या वाक्याने वादाची ठिणगी पेटली. त्यानंतर सण, समारंभातील डीजेच्या वापरावरून पुण्यात कल्लोळ उडाला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. बापट यांना मारहाण झाल्यावर त्यांच्या समर्थनार्थ आणि ध्वनिवर्धकविरोधी मोर्चे काढण्यात आले. त्यामध्ये सर्वसामान्य पुणेकर उतरल्याने सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष निर्माण झाला.

विरोधाची धार कमी करण्यासाठी भाजपचे डावपेच

सत्ताधारी भाजपविरोधात वातावरण तयार होत असल्याचे लक्षात आल्यावर भाजपने विरोधाची धार कमी करण्यासाठी डावपेच सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांंस्कृतिक परंपरा राखत गणेशोत्सव साजरा करून दाखविण्याचे आवाहन पुणेकरांना केले. गणेश मंडळाचे बहुतांश कार्यकर्ते हे राजकीय पक्षांच्या विचारांशी संबंधित असल्याने त्यांना न दुखवता परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलने, मोर्चे यामुळे निर्माण झालेले वातावरण बदलण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भाजपचे मंत्री, आमदार, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. या मेळाव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘फेक नरेटिव्ह’विरूद्ध लढण्यासाठी सज्ज राहण्याचा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी

भाजपने प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात घेण्यामागे विरोधातील वातावरण बदलून पुन्हा भाजपचीच चर्चा कायम राहणे, हा होता. मात्र, प्रत्यक्षात मेळाव्यामुळे पुण्यातील वातावरणात फारसा फरक पडला नाही. या बैठकीचे नियोजन; तसेच पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाच्या नगरसेवकांमध्ये उघडपणे सुरू असलेला वाद, आरोप-प्रत्यारोपावरून मुख्यमंत्री फडणवीस हे नाराज झाले. त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची या बैठकीनंतर कानउघाडणी केली. मेळाव्याचा प्रभाव पुणेकरांवर न पडल्याने भाजपचा हा डाव असफल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आक्रोश मोर्चानंतर भाजपमध्ये अस्वस्थता

‘जेन झी’ सोबत असल्याचे दाखविण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असला, तरीही स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात असलेल्या तरुणांनी काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या आवाजाने पुन्हा एकदा भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. वातावरण पूर्वपदावर कसे आणायचे, असा प्रश्न भाजपला पडला आहे.

काँग्रेस अद्यापही ‘स्वान्तसुखाय’

पुण्यात आंदोलने, मोर्चे यांच्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत असताना पुणेकर हे रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, ही संधी साधण्याऐवजी काँग्रेस ‘स्वान्तसुखाय’ स्थितीत आहेत. राहुल गांंधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमानंतर काँग्रेसचे स्थानिक नेते नेहमीप्रमाणे शांततेच्या भूमिकेत आहे. पुणेकरांच्या आंदोलनात सहभागी होऊन काँग्रेसला पाठिंबा मिळविण्यासाठी स्थानिक नेते फारसे प्रयत्न करताना आढळून येत नाहीत. त्यामुळे काँग्रेस पूर्वीसारखीच निद्रितावस्थेत असल्यासारखी स्थिती दिसत आहे.