पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळविल्यानंतर आता निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्यांना स्वीकृत नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत. संख्याबळानुसार दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी सात जण हे भाजपचे असणार आहेत. निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला. आता डावलेलेल्या नातेवाईकांना भाजप ‘स्वीकृत’ करणार का, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला ११९, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे २७, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला तीन, काँग्रेसला १५, शिवसेना ठाकरे पक्षाला एक जागा मिळाली. शिवसेना (शिंदे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) एकाही ठिकाणी विजय मिळविता आला नाही. आता स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संख्याबळानुसार भाजपचे सात, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. या दहा जागांसाठी १९३ जणांनी अर्ज महापालिकेकडे आले आहेत. नऊ मार्च रोजी त्यापैकी दहाजणांची निवड होणार आहे.
भाजपने उमेदवारी देताना अनेकांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे आश्वसन दिले. त्यामुळे निवडणुकीच्या काळात बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आले. नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा आदेश राज्य पातळीवरून आल्याने अनेक नेत्यांचा हिरमोड झाला. मात्र, आता डावलल्या गेलेल्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
उमेदवारी नाकारलेले नेत्यांच्या संपर्कात
महापालिका निवडणुकीत विविध कारणांनी सुमारे ४० माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. ते माजी नगरसेवक हे बाहेरून मार्गाने महापालिकेच्या सभागृहात येण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. त्यांच्याकडून नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत. मात्र, उमेदवारी नाकारलेल्यांना संधी देण्याबाबत राज्य पातळीवरून आदेश येणार असल्याचे सांगत नेत्यांकडून आता हात झटकले जात आहेत. त्यामुळे माजी नगरसेवकांंमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
‘शब्द’ पाळण्याचे आव्हान
महापालिका निवडणुकीत सुमारे २३०० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६५ जणांना संधी देण्यात आली. उर्वरित इच्छुक नाराज झाले. मात्र, बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांना स्थानिक नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक करण्याचा ‘शब्द’ दिला. मात्र, इच्छुकांची संख्या जास्त असल्याने दिलेला शब्द पाळण्याचे आव्हान नेत्यांपुढे उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
‘माननीयां’च्या कुटुंबातील उमेदवार
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे कोथरुडमधील मयूर कॉलनी या प्रभागाचे नगरसेवक होते. त्यामुळे ही जागा आपल्या कुटुंबाकडे कायम ठेवण्याकडे त्यांचा कल होता. त्यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ यांचे नाव चर्चेत होते. दुष्यंत मोहोळ यांच्याकडे भाजप युवा मोर्च्याच्या शहराध्यक्ष पदाचीही धुरा देण्यात आली. मात्र, त्यांची संधी गेली.
भाजपच्या विद्यमान आमदारांपैकी राज्याच्या नगरविकास, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे चिरंजीव करण मिसाळ यांच्याही नावाची चर्चा होती. भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या कन्या सुप्रिया कांबळे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही.
विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रंजना टिळेकर यांना भाजपने उमेदवारी दिली. त्या निवडून आल्या. भाजपच्या माजी आमदारांपैकी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडून आले. आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक हे माजी नगरसेवक आहेत. सलग दोनवेळा ते निवडून आले आहेत. यावेळी त्यांनी ‘हॅटट्रीक’ साधली. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यादेखील विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि स्नुषा ऐश्वर्या पठारे यांना भाजपने उमेदवारी दिली आणि दोघेही निवडून आले.

