पुणे : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर हे शिवसेना (शिंदे) पक्षाकडे गेल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्ष अडचणीत आला असताना पक्षाची ‘मशाल’ पेटविण्यासाठी आता ज्येष्ठ शिवसैनिक रणांगणात उतरणार आहेत. पक्षनिष्ठा काय असते, हे दाखविण्यासाठी १३० ज्येष्ठ शिवसैनिकांचा ताफा मुंबईत ‘मातोश्री’वर जाणार आहे. ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीला नतमस्तक होऊन पक्षाने नव्या उमेदीने कामाला लागण्याचा संदेश देणार आहेत.
तत्कालीन शिवसेनेने पुण्यात पाय रोवण्यास सुरुवात केल्यानंतर प्रारंभीच्या काळात पक्षवाढीसाठी कष्ट केलेले आणि वेळप्रसंगी आंदोलनात लाठ्याकाठ्यांचा मार सोसलेले ज्येष्ठ शिवसैनिक हे आता अडचणीच्या काळात पक्षाला उभारी देण्यासाठी सरसावले आहेत. शहरप्रमुख वसंत मोरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
याबाबत मोरे म्हणाले,‘काहीजण पक्ष सोडून गेले असले, तरी पक्ष पुन्हा उभा राहील. पक्षनिष्ठा कशी आहे, हे दाखविण्यासाठी पुण्यातील १३० ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी येत्या रविवारी (पाच जुलै) ‘चलो मातोश्री दर्शन’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचे दर्शन घेण्याची इच्छा या ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केली. त्यानुसार या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातून हे ज्येष्ठ शिवसैनिक मातोश्री येथे गेल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या या निर्धारामुळे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल.’
पुण्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाची ताकद किती?
पुण्यात १९९५ मध्ये तत्कालीन शिवसेनेचे एकाच वेळी तीन आमदार आणि २००७ मध्ये पुणे महापालिकेत २० नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना दुभंगल्यावर पुण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मान्य केली. पुण्याकडे लक्ष देईन, असे आश्वासन त्यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी दिले. पुणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले. त्यांपैकी अविनाश साळवे हे काँग्रेसमध्ये गेले. विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची अल्हाट, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, पृथ्वीराज सुतार, संजय भोसले हे माजी नगरसेवक भाजपमध्ये गेले. श्वेता चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात, तर प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे हे शिवसेना (शिंदे) पक्षाकडे गेले. पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत या पक्षाचे नितीन गावडे हे एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत. पुण्यातील ताकद दिवसेंदिवस क्षीण होत गेली असताना पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणारे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानेे पक्षामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिक आता पुढे आले आहेत.
