पुणे : नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतर आता सहकार क्षेत्रातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सहकारी संस्थांचे जाळे असून, सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील विविध एक हजार १५४ सहकारी संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका आता टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखाना, बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना या प्रमुख सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका या नेत्यांची ‘राजकीय प्रयोगशाळा’ समजली जाते. राजकारणाच्यादृष्टीने सहकारी साखर कारखाने हे महत्त्वाचे मानले जातात. साखर कारखाने हे ग्रामीण भागातील आर्थिक स्रोत असतात. शेतकरी सभासद, ऊस तोडणी मजूर आणि वाहतूकदार हे कारखान्यांशी जोडलेले असतात. कारखान्याच्या हाती सत्ता असलेल्या स्थानिक राजकीय नेतृत्वाकडे कारखान्याचे सभासद असलेल्या कुटुंबांचे आर्थिक हितसंबंध असतात. कारखान्याकडून देण्यात येणारी ‘एफआरपी’ उसाची उचल, बोनस या गोष्टी मतदारांना प्रभावित करतात. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांच्या वेळी प्रचारासाठी साखर कारखान्याची यंत्रणा ही राजकीय पक्षांना सहाय्यभूत ठरत असते. त्यामुळे साखर कारखान्यांच्या निवडणुकांना महत्त्व असते. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांची राजकीय कारकीर्द ही साखर कारखान्याच्या संचालकपदापासून झाली आहे. कारखाना फायद्यात असेल, तर संबंधित नेत्याचे तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढत जाते. पुणे जिल्ह्यात आता महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे.
निवडणुका प्रलंबित असलेले कारखाने
आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा सहकारी साखर कारखाना हा दौंड तालुक्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. या कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत सहा वर्षांपूर्वीच संपली आहे. निवडणुकीसाठी संबंधित कारखान्याला निवडणूक प्राधिकरणाकडे निवडणूक निधी भरावा लागतो. तो निधी न भरल्याने या कारखान्याची निवडणूक प्रलंबित आहे. आता या कारखान्याच्या निमित्ताने दौंड तालुक्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा महत्त्वाचा कारखाना आहे. या कारखान्याच्या निवडणुकांच्यानिमित्ताने पुन्हा एकदा बारामती तालुक्यात निवडणुकांचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रभुत्त्व असलेल्या इंदापूरमधील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आगामी काळात होणार आहे. सोमेश्वर आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांची मुदत येत्या ऑक्टोबर महिन्यात संपणार आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी या निवडणुका घेण्याची तयारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सुरू केल्याचे सांगण्यात आले.

