पुणे : विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजप-शिवसेनेत संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक दिवसांपासून राजकीय विजनवासात असलेले माजी आमदार, शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर हे प्रचारासाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. ‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार’ ही भूमिका घेऊन ते आता सानप यांच्यासाठी भाजपशी पुन्हा दोन हात करणार आहेत.

पुणे शिक्षक मतदार संघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपवर दबाब आणण्यासाठी शिवसेनेने मंगेश चिवटे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले गेले. मात्र, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी स्वीय सहायक सचिन सानप यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानप यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केल्यानंतर या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या मतदार संघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेमुळे भाजपपुढे आव्हान

या मतदार संघात भाजपचे गावडे आणि काँग्रेसचे आसगावकर यांच्यात सरळ लढतीचे चित्र असताना आता सानप यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेने प्रामुख्याने भाजपपुढे आता आव्हान उभे केले आहे.

अभिजित बिचुकले उमेदवार

पुणे शिक्षक मतदार संघात ३० उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामध्ये गावडे, आसगावकर आणि सानप या प्रमुख उमेदवारांबराेबरच विविध निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरणारे ‘बिग बॉस मराठी’तील अभिजित बिचुकले हेदेखील या मतदार संघात अपक्ष उमेदवार आहेत.

रवींद्र धंगेकर यांच्यामुळे निवडणुकीत रंगत?

पुण्यात भाजप आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना उघड आव्हान देणारे माजी आमदार, शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर हे आता सानप यांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरणार आहेत. ‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार’ असे जाहीर करत त्यांनी प्रामुख्याने भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. आसगावकर आणि गावडे हे दोघेही कोल्हापूरचे उमेदवार आहेत. सानप हे पुण्यातील उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर धंगेकर यांनी सानप यांच्या प्रचारासाठी व्यूहरचना आखली आहे.

धंगेकर यांनी सानप यांच्या प्रचारासाठी पत्रक काढून प्रचाराचा प्रमुख मुद्दा काय असणार, हे स्पष्ट केले आहे. ‘शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी विधान परिषदेत लोकप्रतिनिधी म्हणून एक हाडाचा शिक्षकच असावा. शिवसेना आणि मी स्वतः संपूर्ण ताकदीने आणि निष्ठेने सानप यांच्या पाठीशी उभे आहोत.’ असे त्यांनी जाहीर केले आहे.

‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार’ प्रचाराच्या या प्रमुख मुद्याबरोबरच धंगेकर हे प्रचारात आणखी कोणते मुद्दे पुढे आणणार, याकडे आता भाजपचे लक्ष असणार आहे. पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शिक्षक मतदार संघातून सचिन सानप यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. मी ताकदीने आणि निष्ठेने सानप यांच्या पाठीशी असणार आहे. प्रचाराची रणनीती लवकरच जाहीर केली जाईल. रवींद्र धंगेकर, माजी आमदार, शिवसेनेचे महानगरप्रमुख