पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीची काेंडी झाली आहे. महायुतीकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर नाराजीचा फायदा उठविण्याची व्यूहरचना या पक्षाने आखली असून, आता महायुतीकडून उमेदवार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

या मतदार संघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ही जागा असली, तरी पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. ‘राष्ट्रवादी’नंतर भाजप हा दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष आहे. त्यामुळे महायुतीत उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाता पुण्याचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. ‘राष्ट्रवादी’कडून पुणे शहरातील माजी आमदार सुनिल टिंगरे, पिंपरी-चिंचवड शहरातील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील माजी आमदार रमेश थोरात आणि दिलीप मोहिते यांची नावे चर्चेत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची रणनीती काय ?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार श्रीकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र निवडणूक लढविली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे असलेल्या सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाशीही संपर्क आहे. त्या मतदारांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मदार असणार आहे. 

या मतदार संघात ८६७ मते आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेतील १६५ नगरसेवक आणि १० स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषदेत निवडून आलेले ७३ सदस्य आणि १३ नियुक्त सदस्य आहेत. नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये निवडून आलेले सर्वाधिक ४३२ सदस्य आणि ४३ नियुक्त सदस्य आहेत. पुणे, देहूरोड आणि खडकी कॅन्टान्मेंट बोर्डात प्रत्येकी एक नियुक्त सदस्य आहे. त्यांपैकी ‘राष्ट्रवादी’ ३७० मतांचा, तर भाजपने ३३३ मतांचा दावा करत आहेत. 

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद कमी आहे. या तिन्ही पक्षांचे ४७ सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी काँग्रेसचे १९, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ११ जण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे १७ सदस्य आहेत.

श्रीकांत पाटील कोण?

श्रीकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. त्यांनी बोपोडी भागातून नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांचे वडील वि. भा. पाटील १९६९ मध्ये पुण्याचे महापौर होते. तसेच १९७७ मध्ये ते पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. वि. भा. पाटील हे उमेदवार असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. तेव्हा त्यांच्याविरूद्ध संभाजीराव काकडे हे उमेदवार होते. शरद पवार यांच्यामुळे वि. भा. पाटील हे निवडून आले होते. आता सुमारे ४९ वर्षांनी श्रीकांत पाटील यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे रणांगणात असणार आहेत. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.