पुणे : राज्यात ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना लागू केल्यामुळे महायुती पुन्हा सत्तेवर येऊ शकली. त्याच ‘लाडक्या बहिणी’ आता भविष्यात पुण्याचे खासदार, आमदार आणि नगरसेवक हे लोकप्रतिनिधी ठरविणार आहेत. कारण पुण्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या ही जास्त झाली असून, दहा लाख ३०८ महिला मतदारांचा कल हा २०२९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निर्णायक असणार आहे. ‘एसआयआर’ मोहिमेनंतर प्रारुप मतदार यादी जाहीर झाली आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांमध्ये ६२ लाख १३ हजार ६९२ मतदार झाले आहेत. त्यामध्ये भोसरी मतदार संघात सर्वाधिक ४ लाख ६१ हजार ९३४ मतदार आहेत, तर शिवाजीनगरमध्ये सर्वात कमी एक लाख ६३ हजार २६१ मतदार आहेत.
पुणे शहरात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या आठ विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. या आठ मतदार संंघात पुरुष मतदार ९ लाख ८२ हजार ६८४ झाले आहेत, तर १० लाख ३०८ महिला मतदारांची नावे आहेत. त्यामुळे १७ हजार ६२४ महिला मतदारांची संख्या ही जास्त आहे.
कोणत्या मतदार संघांत महिलाराज?
पुण्यातील आठपैकी सहा विधानसभा मतदार संघात महिलाराज असणार आहे. वडगाव शेरी मतदारसंघात पुरुष मतदार १,५७,३९२ असून महिला मतदार १,५७,५२० आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार ७९,२४२, तर महिला मतदार ८४,००२ आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघात पुरुष १,१८,४४४ आणि महिला १,२२,७४६ मतदार आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार १,५९,९३९ असून, महिला मतदार १,५९,३०९ आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात पुरुष १,०८,२८९ आणि महिला १,११,२४५ मतदार आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार १,७८,३७७ आणि महिला मतदार १,७४,६९० आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात पुरुष ८७,४६७ आणि महिला ९२,१२७ मतदार आहेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार ९३,५३४ असून महिला मतदार ९८,६६९ आहेत.
या मतदार संघांत्यापैकी वडगाव शेरीत १२८ महिला मतदार जास्त, शिवाजीनगरमध्ये ४,७६०, कोथरूडमध्ये ४,३०२, पर्वतीमध्ये २,९५६, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ४,६६० आणि कसबा पेठमध्ये ५,१३५ महिला मतदार या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहेत. अन्य दोन विधानसभा मतदार संघांपैकी खडकवासला आणि हडपसर या विधानसभा मतदार संघांत महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहेत. खडकवासलामध्ये ६३० पुरुष मतदार जास्त आहेत, तर हडपसरमध्ये ३,६८७ पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे. हे दोन्ही मतदार संघातील निम्मा भाग हा समाविष्ट गावांमधील आहे.
‘एसआरए’ मोहिमेपूर्वीची स्थिती कशी होती?
‘एसआरए’ मोहिमेपूर्वी पुण्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी फक्त कसबा पेठ या एकाच मतदारसंघात महिलांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त होती. तेव्हा पुरुष मतदार १,४०,०११, तर महिला मतदार १,४४,६२२ होत्या. म्हणजेच महिला मतदार या ४,६११ जास्त होत्या. आता आठपैकी सहा मतदार संघांचा आगामी काळातील निवडणुकांचा निकाल हा महिलांच्या हाती असणार आहे.
राजकीय बलाबल
सध्या पुण्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी सहा मतदार संघ हे भाजपकडे आहेत. एक मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे, तर अन्य एक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे आहे. कोथरूडमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्वतीत परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे, खडकवासलामध्ये भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे आणि कसबा पेठ मतदार संघात हेमंत रासने हे भाजपचे सहा आमदार आहेत. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बापू पठारे आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे चेतन तुपे हे आमदार आहेत. आगामी २०२९ च्या निवडणुकांमध्ये हडपसर आणि खडकवासला हे दोन मतदार संंघ वगळता अन्य सहा ठिकाणी ‘लाडक्या बहिणी’ लोकप्रतिनिधींचे भवितव्य ठरविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
