पुणे : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदापासून दूर रहावे लागल्याने राजकीय प्रवास खडतर असल्याची जाणीव झालेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन माजी आमदारांच्या मुलांना आता विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार या चार विषय समित्यांच्या सभापतिपदावर तिघांना संधी देणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र निवडणूक लढवून ७३ पैकी ५१ जागा घेत बहुमत मिळवले. अध्यक्षपदासाठी चुरस होती. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दौंड तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे यांना अध्यक्षपद आणि माजी मंत्री, आंबेगाव विधानसभेचे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांना उपाध्यक्षपद दिले. त्यामुळे जिल्ह्यातील माजी आमदारांच्या मुलांच्या पदरी निराशा आली.
या पदासाठी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात, इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील- ठाकरे आणि भोरचे माजी आमदार काशिनाथ खुटवड यांचे चिरंजीव विक्रम खुटवड या तीन माजी आमदारांची मुले इच्छुक होती. मात्र, त्यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदापासून दूर रहावे लागले. आता कृषी, बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण या चार महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. दोन एप्रिल रोजी निवड जाहीर केली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ३१ मार्च रोजी मुंबईत बैठक घेतली. त्या बैठकीत सभापतिपदांबाबत चर्चा करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सांगण्यात आले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील- ठाकरे या इंदापूर तालुक्यातील बावडा या गटातून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात हे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून केडगाव-बोरीपारधी गटातून निवडून आले आहेत.
विक्रम खुटवड हे कामथडी- भोंगवली गटातून निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी तृप्ती विक्रम खुटवड या त्याच गटातील कामथडी या पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत. विक्रम खुटवड हे यापूर्वी २००७ मध्ये पंचायत समिती सदस्य होते. या पंचायत समितीचे ते उपसभापती होते. २०१४ मध्ये त्यांनी भोरमधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. आता ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. या तिघांपैकी कोणाची सभापतिपदावर वर्णी लागणार, हे दोन एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे.
