पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार रंगात आला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने पुणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारावर दु:खाचे सावट पसरले आहे. सर्वच पक्षांनी प्रचार थांबवला असल्याने या निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाल्यासारखे वातावरण जिल्ह्यात आहे. बारामतीतील गेल्या ३० वर्षांपासून अजित पवार यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे बहुजन समाज पक्षाचे (बसप) राज्य महासचिव काळुराम चौधरी यांनीही निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार हे बारामती येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी निघाले असताना बुधवारी विमान दुर्घटनेत त्यांचा करुण अंत झाला. त्या दिवशी पवार यांच्या चार ठिकाणी सभा होत्या. सकाळी साडेनऊ वाजता निरावागज येथे, सकाळी साडेअकरा वाजता पणदरे, दुपारी अडीच वाजता करंजेपूल आणि सायंकाळी पाच वाजता सुपा येथे सभा होणार होती. मात्र, विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र दु:खाचे वातावरण आहे. तीन दिवस दुखवटा जाहीर करण्यात आल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस लांबणीवर गेल्या आहेत. आता सात फेब्रुवारी रोजी मतदान आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. प्रचाराची सांगता पाच फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता करण्याच्या निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. मात्र, अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पुणे जिल्ह्यातील प्रचाराची सांगता झाल्यासारखे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि पंचायत समितीचे १४६ गण आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इंदापूरमध्ये सर्वाधिक ४१ तर, वेल्ह्यात सर्वांत कमी आठ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. बारामतीमध्ये जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे १२ गण आहेत. बारामतीत जिल्हा परिषदेसाठी ३२ उमेदवार आहेत. दौंडमध्ये ३४, खेडमध्ये २८,जुन्नरमध्ये २७, आंबेगावात २४, शिरूरमध्ये १७, मावळमध्ये १३, मुळशीत १८, पुरंदरमध्ये १९,भोरमध्ये २० आणि हवेलीत २५ उमेदवार आहेत. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वपक्षांंकडून प्रचार थांबविण्यात आला आहे. प्रचारासाठी आणखी पाच दिवसांचा कालावधी असला, तरी बहुतांश पक्षांनी जाहीर सभा आणि मेळावे न घेता वैयक्तिक गाठीभेटींवर भर देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रचाराची सांगता झाल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.
प्रचार न करण्याचा निर्णय
बारामतीमध्ये अजित पवार यांचे राजकीय विरोधक म्हणून बहुजन समाज पक्षाचे महासचिव काळुराम चौधरी यांची ओळख आहे. मात्र, दुदैवी घटनेनंतर त्यांनीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत काळुराम चौधरी म्हणाले, ‘अजित पवार यांचे अकाली निधन ही धक्कादायक घटना आहे. गेल्या सुमारे ३० वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत लढा देत आलो आहे. यावेळीही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बसपचे पाच उमेदवार आहेत. पंचायत समीतीच्या निवडणुकीसाठीही बसपने नऊ उमेदवार उभे केले आहेत. मात्र, या घटनेनंतर प्रचार न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

