पुणे : राजकारणात घराणेशाही हा कायम वादाचा मुद्दा असला, तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारांनी घराणेशाहीला बळ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदारांनी भरघोस मते दिल्याने पुढच्या पिढीचा राजकारणातील मार्ग सुकर झाला आहे. राजकारणातील घराणेशाहीबद्दल कितीही ओरड करण्यात आली, तरी मतदार मात्र नातीगोतीभोवतीच गुरफटून राहिल्याचे पुणे जिल्ह्यातील निवडणूक निकालावरून दिसून आले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आजी-माजी आमदारांनी आपापल्या कुटुंबातील व्यक्तींना उभे केले होते. त्यापैकी बहुतांश आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींना मतदारांनी निवडून दिले.

ठाकरेंच्या सुनेला सलग दुसऱ्यांदा यश

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्या जिल्हा परिषदेच्या इंदापूर तालुक्यातील बावडा गटातून उभ्या होत्या. त्या गेल्या निवडणुकीतून त्या मतदार संघातून निवडून आल्या होत्या. अंकिता यांचा विवाह शिवसेना (ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्याशी झाला आहे. त्या पुन्हा या मतदार संघातून निवडून आल्या आहेत.

आमदार कन्या विजयी

वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांच्या दोन्ही कन्या दीपाली गव्हाणे, रुपाली झेंडे या निवडून आल्या आहेत. गव्हाणे या शिरूरमधून, तर झेंडे या पुरंदर तालुक्यातून निवडून आल्या आहेत.

माजी आमदार विलास लांडे यांची कन्या विनया मुंगसे या खेडमधून विजयी झाल्या.

आमदार पुत्रांचा राजकारणात प्रवेश

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे पहिल्यांदाच निवडणुकीत उभे होते. इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समितीच्या निवडणुकीतून ते उभे होते. त्यांना मतदारांनी भरघोस मते दिली.

शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जिल्हा परिषदेच्या टाकळी हाजी गटातून निवडणूक लढवली.राजेंद्र गावडे हे निवडून आले.

माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात, माजी आमदार काशीनाथ खुटवड यांचे चिरंजीव विक्रम खुटवड हे विजयी झाले.

आमदारांच्या सौभाग्यवती राजकारणात

भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांची पत्नी स्वरूपा थोपटे या भोरमधून पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभ्या होत्या. त्या निवडून आल्या. संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार या विजयी झाल्या. शिरूरमधील मांडवगण फराटा गटातून माजी आमदार अशोक पवार यांची पत्नी सुजाता पवार या विजयी झाल्या.
मात्र, दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांची पत्नी मालती पाचर्णे यांचा पराभवाला सामोरे जावे लागले.

आमदार भगिनीचा पराभव

खेड – आळंदीचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्यावर वर्चस्व मिळवले आहे. मात्र, त्यांच्या बहिणीचा पाईट-आंबेठाण गटातून पराभव झाला आहे.

पुतण्या विजयी

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे आंबेगाव तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत.