पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुरंदरमध्ये महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या मित्रपक्षांमध्येच संघर्ष पेटला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुरंदरचे शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे पारंपरिक राजकीय वैरी या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोरासमोर आल्याने पुरंदरमध्ये मित्रपक्षांमध्येच संघर्ष पेटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लोकसभेत काय झाले होते?
महायुती झाल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरुवातीला संघर्ष झाला. बारामती लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका शिवतारे यांनी घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवतारे आणि अजित पवार यांच्यात दिलजमाई झाली. शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. मात्र, प्रत्यक्षात त्यांना पुरंदरमध्ये मताधिक्य मिळू शकले नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी महायुती असतानाही शिवतारे यांच्याविरोधात संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली. शिवतारे यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी आमदार संजय जगताप उमेदवार होते. २०१९ च्या निवडणुकीत जगताप यांनी शिवतारेंचा पराभव केला. त्या वेळी शिवतारे यांच्या पराभवासाठी अजित पवार यांनी ताकद लावली. ‘तू कसा निवडून येतो तेच मी बघतो,’ असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी शिवतारे यांना दिले. त्या वेळी शिवतारे यांचा पराभव झाला. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवतारे सुरुवातीला विरोधाच्या भूमिकेत होते. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी उमेदवार उभा करूनही शिवतारे विजयी झाले.
हट्टाने मिळविलेली नगर परिषद अजितदादांकडे
शिवतारे यांच्या आग्रहास्तव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी फुरसुंगी आणि उरुळी कांचनचा परिसर महापालिका हद्दीतून वगळून नगर परिषद तयार केली. या निवडणुकीच्या निमित्तानेही अजित पवार आणि शिवतारे हे पुन्हा समोरासमोर आले. मात्र, ही नगर परिषद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात गेली.
आता पुन्हा समोरासमोर
आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शिवतारे यांच्यात लढत असल्याने दोघांमधील संघर्ष पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार आणि शिवतारे यांच्यात पुन्हा एकदा लढत होणार आहे.
ऐन वेळी युतीत खडा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने युती करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. मात्र, पुणे महापालिकेप्रमाणे भाजपने ऐन वेळी युती न करता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे शिवतारे आणि जगताप या राजकीय हाडवैर असलेल्या दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा लढत होणार आहे.
वादात फायदा कोणाचा?
पुरंदरमध्ये अजित पवार, शिवतारे आणि जगताप या महायुतीतील मित्रपक्षांच्या तीन नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. शिवतारे हे नगर परिषदेतील पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत, तर जगताप शिवतारे यांनी विधानसभेत केलेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सरसावले आहेत. अजित पवार हे दोघांमधील राजकीय वैराचा फायदा घेण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे पुरंदरमध्ये महायुतीतील मित्रपक्षांमध्येच संघर्ष पेटल्याचे दिसून येते.
