Pune Zilla Parishad panchayat samiti elections: पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी कुटुंबातील व्यक्तींना उभे केले असल्याने दुसऱ्या पिढीची ‘परीक्षा’ असणार आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या घराणेशाहीला मतदार थारा देणार का, याबाबत उत्सुकता आहे. ठाकरे कुटुंबातील सून इंदापूरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी लढत होणार आहे. या वेळच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी आपापल्या कुटुंबातील सदस्यांना उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे.
कृषीमंत्र्यांचे चिरंजीव राजकारणात
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिल्यांदाच चिरंजीव श्रीराज भरणे यांना निवडणुकीत उतरवले आहे. इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समितीच्या निवडणुकीतून श्रीराज राजकारणातील नशीब आजमावून पाहणार आहेत.
इंदापूरमध्ये ठाकरे कुटुंबातील सून रिंगणात
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या बावडा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या निवडणुकीत त्या या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. अंकिता यांचा विवाह शिवसेना (ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्याशी झाला आहे. हर्षवर्धन पाटील आणि ठाकरे ही दोन्ही राजकीय घराणी असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
वैर विसरून भरणे-पाटील एकत्र
इंदापूरच्या राजकारणात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राजकीय शत्रू मानले जातात. मात्र, भरणे मुलासाठी, तर पाटील मुलीसाठी राजकीय वैर विसरून एकत्र आले आहेत. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून या पक्षात प्रवेश केला. नगर परिषदेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील इंदापूरचे माजी नगराध्यक्ष, अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांच्याबरोबर होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र असल्याने भरणे आणि पाटील यांचे मनोमीलन झाले आहे. त्यामुळे पाटील आता गारटकर आणि माने यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. इंदापूरकर या घराणेशाहीला थारा देणार का, याबाबत उत्सुकता आहे.
गावडे कुटुंबाची परंपरा
शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जिल्हा परिषदेच्या टाकळी हाजी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावडे माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जातात. या कुटुंबाने सलग सुमारे ५० वर्षे जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले. आता राजेंद्र गावडे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक आहे.
संग्राम थोपटे यांची पत्नी उमेदवार
भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांची पत्नी स्वरूपा थोपटे या भोरमधून पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत. संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत थोपटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भोर नगर परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि त्यानंतर माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता होती. मात्र, आता अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ची सत्ता आली आहे.
